गळतीच्या पाण्यावर भागवितात तहान
By Admin | Updated: May 14, 2015 01:22 IST2015-05-14T01:17:35+5:302015-05-14T01:22:00+5:30
येथील २५ ते ३० वर्षांपूर्वीची नळ पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे.

गळतीच्या पाण्यावर भागवितात तहान
वैरागड : येथील २५ ते ३० वर्षांपूर्वीची नळ पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे. अनेक तांत्रिक त्रुटी असल्यामुळे गावात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी अनेक नागरिकांना गळतीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचे वास्तविक चित्र वैरागडात पहायला मिळत आहे.
जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेत अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे गावात पाण्याचा असमान पुरवठा सुरू आहे. काही वार्डात नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नाही तर अनेक ठिकाणी नळाला पिण्यायोग्य पाणी येत नाही. यामुळे नळ योजनेच्या विहिरीजवळील पाईपलाईनच्या गळतीवर गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. २६ जानेवारी २०१३ च्या ग्रामसभेत उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, नवीन पाणीपुरवठा योजना येथील नदीच्या गोरजाई डोहावर कार्यान्वित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सदर ठराव तत्काळ पेयजल पाणीपुरवठा यंत्रणेकडे पाठविण्याबाबत ग्रामसभेने सूचित केले होते. मात्र स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने नळ पाणीपुरवठा योजनेचा ठराव पेयजल विभागाकडे पाठविण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लावला.
राष्ट्रीय पेयजल उपविभाग कुरखेडा कार्यालयाच्या अभियंत्याने गावाच्या औद्योगिक व ऐतिहासिक पार्श्वभूमिचा विचार करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार केला व सदर कृती आराखडा वैरागड ग्राम पंचायत प्रशासनाला पाठविला अशी माहिती आहे. दरम्यान वैरागड ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने नव्या नळ योजनेची प्रशासकीय मान्यता थांबून होती. वैरागड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ व भोयर यांच्या घरानजीकच्या ग्राम पंचायतीच्या मोकळ्या जागेत वाढीव दोन जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. मात्र नळयोजनेच्या विहिरीला जलस्त्रोत कमी असल्याने गावातील पाणीटंचाईची समस्या कायम राहिली.
नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात नदीपात्रात शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याचे काम अर्धवट राहिल्याने या शिवकालीन बंधाऱ्याचा पाणीटंचाईच्या समस्येवर काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे वैरागड गावात गेल्या महिनाभरापासून नागरिकांना पाणीटंचाई समस्या भेडसावत आहे. (वार्ताहर)