स्वच्छता अभियानात कसारी राज्यात तिसरे
By Admin | Updated: March 31, 2016 01:45 IST2016-03-31T01:45:09+5:302016-03-31T01:45:09+5:30
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान गावात यशस्वीरित्या राबविण्यासोबतच विविध पुरस्कारांचे मानकरी ....

स्वच्छता अभियानात कसारी राज्यात तिसरे
२०१२- १३ चा पुरस्कार : जिल्ह्याचा गौरव
देसाईगंज : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान गावात यशस्वीरित्या राबविण्यासोबतच विविध पुरस्कारांचे मानकरी ठरण्याचा इतिहास रचतांनाच सन २०१२- १३ या वर्षासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात कसारी (मेंढा) गावाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. गावाला तृतीय पुरस्कार मिळाल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले.
देसाईगंज तालुक्याच्या टोकावर असलेल्या व १ हजार २२ लोकसंख्या असलेल्या कसारी गावाने स्वच्छतेचा वसा घेऊन विविध स्तुत्य उपक्रम गावात राबविलेले आहेत. अलीकडच्या काळात भ्रुणहत्या थांबवून मुलींचे घटते जन्मदर वाढविणे, नैसर्गिकरित्या जंगलाची वाढ करणे, गावात गुटखा, खर्रा, दारू बंदी, ‘एक गाव, एक गणपती’ यासह विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम गावाने राबविले आहेत. गावात एकता व अखंडता राखण्यात मोलाची भूमिका गावाने बजावली आहे. शासकीय स्तरावरील अनेक योजना गावात यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावाला विविध पुरस्कार प्राप्तही झाले आहेत. यात आणखी पुरस्काराची भर पडली आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात कसारी गावाने राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. गावाने राज्यात तृतीय क्रमांक पटकाविणे ही बाब जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे. गावात पाणीपुरवठा योजना अस्तित्त्वात असती तर गावाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असता, या उणिवेमुळे कमी गुणांक प्राप्त झाले, अशी खंत सरपंच तीर्था पुसाम, अभियान समितीचे अध्यक्ष विलास बन्सोड यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)