पेसा कायद्यावर विचारमंथन
By Admin | Updated: October 11, 2014 23:06 IST2014-10-11T23:06:56+5:302014-10-11T23:06:56+5:30
सुशिक्षित बेरोजगार संघटना जिल्हा गडचिरोलीच्यावतीने आज शनिवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात ‘सर्व उमेदवार एकाच मंचावर’

पेसा कायद्यावर विचारमंथन
चर्चासत्र : गैरआदिवासींच्या पाठीशी राहण्याचे उमेदवारांचे अभिवचन
गडचिरोली : सुशिक्षित बेरोजगार संघटना जिल्हा गडचिरोलीच्यावतीने आज शनिवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात ‘सर्व उमेदवार एकाच मंचावर’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात उपस्थित सर्वच उमेदवारांनी राज्यपालाच्या पेसा कायद्याबाबतच्या अधिसुचनेमध्ये शिथिलता करून गैर आदिवासींना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट केली.
या चर्चासत्राला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या उमेदवार सगुणा तलांडी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम, भाजपचे उमेदवार डॉ. देवराव होळी, शिवसेनेचे उमेदवार केसरी उसेंडी, भारिप बमसच्या उमेदवार कुसूम अलाम, मनसेच्या उमेदवार रंजीता कोडाप, आॅल इंडिया फारवर्ड ब्लॉकचे उमेदवार नारायण जांभुळे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डॉ. देवीदास मडावी तसेच अपक्ष उमेदवार सुनंदा आतला आदी ९ उमेदवार उपस्थित होते.
यावेळी सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्यावतीने महामहिम राज्यपालांनी काढलेले ९ जून २०१४ रोजीची नोकरीविषयक अधिसूचना, जिल्ह्यातील ओबीसी, एससी, एन. टी., एसबीसी यांचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करणे, जिल्हा निवड मंडळ स्थापन करणे, ओबीसी, एन. टी., वि. जे., एस. बी. सी. विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची उत्पन्न मर्यादा ४.५ लाखावरून ६ लाखापर्यंत करणे, जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करणे आदी मुद्दे ठेवण्यात आले होते. उपस्थित नवही उमेदवारांनी या पाचही मुद्द्याच्या अनुषंगाने आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली.
या चर्चासत्राचे संघटनेच्यावतीने ध्वनीचित्रीकरणही करण्यात आले. यामुळे उमेदवारांनी बिगर आदिवासींच्या या महत्वाच्या पाच प्रश्नांवर स्पष्ट केलेलीे भूमिका निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हाभरातील जनतेपुढे मांडणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या चर्चासत्राला ओबीसी व बिगर आदिवासी नागरिक उपस्थित होते. यावेळी काही उमेदवारांनी आरक्षण कमी केल्याच्या मुद्द्यांवर विविध राजकीय नेत्यांवर टिका करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयोजकांनी सदर व्यासपीठ राजकीय नसल्याचे सांगून उमेदवारांच्या टिकेच्या वक्त व्याला पूर्ण विराम दिला.
पेसा कायद्याच्या विरोधात बिगर आदिवासी संघटनेच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे साऱ्याच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष आहे. मात्र पेसा कायद्याच्या चर्चासत्राला आज गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १३ पैकी ९ उमेदवारांनी हजेरी लावली. ४ उमेदवारांनी या चर्चासत्राकडे पाठ फिरविली. (स्थानिक प्रतिनिधी)