मेडिकल कॉलेज होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:01:00+5:30
मेडिकल कॉलेजसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा गडचिरोलीत किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नियुक्त केलेल्या समितीने नियुक्त केलेल्या समितीने आपला सकारात्मक अभिप्राय दिला आहे.

मेडिकल कॉलेज होणारच
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात रुग्णांना तातडीने आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून इलाज मिळण्यासोबतच येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करणारे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) सुरू होण्याची चिन्हं दिसून लागली आहेत. मेडिकल कॉलेजसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा गडचिरोलीत किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नियुक्त केलेल्या समितीने नियुक्त केलेल्या समितीने आपला सकारात्मक अभिप्राय दिला आहे.
समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.राजेंद्र सुरपाम यांच्यासह प्रा.डॉ.शैलेश धवने व मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड यांनी दोन दिवस गडचिरोलीत यासंदर्भात पाहणी करून माहिती जाणून घेतली. रुग्णालय व निवासासाठी पुरेशी इमारत, मंजूर खाटांची संख्या, उपलब्ध तांत्रिक बाबी यासह भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकनाप्रमाणे आवश्यक पुरेसी जागा उपलब्ध होऊ शकते का, आदी बाबी तपासण्यात आल्या.
मेडिकल कॉलेजसाठी ३०० खाटांचे रुग्णालय आवश्यक असताना जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय मिळून ४०० खाटा उपलब्ध आहेत. याशिवाय वाढीव १०० खाटा बाल रुग्णालयात मंजूर आहेत. २५ एकर जागेची गरज असताना ३७ एकर जागा उपलब्ध आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागील बाजुने असलेल्या झुडपी जंगलाची मोठी जागा उपलब्ध होऊ शकते. याशिवाय निवास व्यवस्थेसाठी नर्सिंग महाविद्यालयाचे वसतिगृह वापरता येऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करता गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे सहज शक्य होणार आहे.
- तर याच वर्षी सुरू होणार?
गडचिरोलीतील प्रस्तावित मेडिकल कॉलेजला अद्याप शासनाने मंजुरी दिलेली नाही. येत्या अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा झाल्यास आणि त्यासाठी लागणारा निधी शासनाने उपलब्ध करून दिल्यास मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. मात्र तत्पूर्वी भारतीय आयुर्विज्ञान परिषद (एमसीआय)च्या चमूकडून सर्व सोयीसुविधांची तपासणी होईल. त्यांच्याकडून काढल्या जाणाऱ्या त्रुटी दूर कराव्या लागतील. त्यांचे पूर्ण समाधान झाल्यानंतरच मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचला प्रवेश देण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. सर्व स्तरावर तातडीने हालचाली झाल्यास २०२०-२१ च्या सत्रापासून हे मेडिकल कॉलेज सुरू होणे अशक्य नाही.