शिवगाटाला जाण्यासाठी रस्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:16 IST2018-03-19T00:16:42+5:302018-03-19T00:16:42+5:30
तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिवगाटा येथे जाण्यासाठी अद्यापही रस्त्याची निर्मिती करण्यात आली नाही.

शिवगाटाला जाण्यासाठी रस्ता नाही
ऑनलाईन लोकमत
धानोरा : तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिवगाटा येथे जाण्यासाठी अद्यापही रस्त्याची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे गावकºयांना जंगलातून ४ किमीची पायपीट करून गावात पोहोचावे लागते. अन् एकीकडे गावात सिमेंटचे रस्ते मंजूर करण्यात आले असून त्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे गावकºयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. स्वातंत्र्यानंतरही गावातील नागरिकांना गावात पोहोचण्यासाठी रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम शिवगाटा गावात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. गावात एकमेव असलेले हातपंप एक महिन्यापासून बंद आहे. गावातील विहिरीच्या पाण्याने तळ गाठले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात जाण्यासाठी रस्ताच नाही, ४ किमी जगंलातून पायवाट काढून गावात जावे लागते. गावातील अंतर्गत रस्त्यांवर मात्र सिमेंटचे रस्ते बनविले जात आहेत. एकीकडे लगतच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही आणि गावात सिमेंटचे रस्ते बनविले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याकडे लक्ष देवून अगोदर गावात जाण्यासाठी रस्त्याची निर्मिती करावी, गावातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी शिवगाटावासीयांनी केली आहे. शिवगाटा या गावात गेल्या एक महिन्यापासून वीज पुरवठा खंडीत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. एकूणच शिवगाटा या गावात विविध समस्या आवासून उभ्या झाल्या आहेत. मात्र या गंभीर समस्यांकडे कन्हाळगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. अशीच परिस्थिती धानोरा तालुक्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या अनेक गावांचे आहे. शासनाकडून विविध योजनेअंतर्गत लाखो रूपये खर्च होतात. मात्र विकास कागदावर आहे.
वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उदासीन
धानोरा तालुका व अहेरी उपविभागाच्या अनेक आदिवासी बहूल दुर्गम गावात रस्ते, शाळा, वीज आदीसह विविध मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. मात्र या समस्याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह पं.स., जि.प. पदाधिकारी, आमदार, खासदार व पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकारीही गाव विकासाबाबत गंभीर नाही.