जगातील सत्य बदलविण्याची ताकद कुणातच नाही
By Admin | Updated: January 31, 2015 23:19 IST2015-01-31T23:19:03+5:302015-01-31T23:19:03+5:30
सत्य म्हणजे रूचा, रूचा अर्थातच वेद होय. प्राचीन ऋषीमुनींनी लिहिलेल्या वेदामध्ये सत्य भरभरून आहे. जगातील सत्य बदलविण्याची ताकद कुणातच नाही, असे प्रतिपादन वेद अभ्यासक माणिक आबाजी गुट्टे यांनी केले.

जगातील सत्य बदलविण्याची ताकद कुणातच नाही
वेदावर व्याख्यान : माणिक गुट्टे यांचे प्रतिपादन
गडचिरोली : सत्य म्हणजे रूचा, रूचा अर्थातच वेद होय. प्राचीन ऋषीमुनींनी लिहिलेल्या वेदामध्ये सत्य भरभरून आहे. जगातील सत्य बदलविण्याची ताकद कुणातच नाही, असे प्रतिपादन वेद अभ्यासक माणिक आबाजी गुट्टे यांनी केले.
शनिवारी संस्कृती लॉनमध्ये ‘वर्तमान वेळेस वेदची प्रासंगिकता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतुल विनोद गुडधे पाटील, प्रकाश अर्जुनवार, नंदकुमार काबरा, सुनिल पोरेड्डीवार, प्राचार्य कविता पोरेड्डीवार, दुधराम समर्थ, सुधा सेता, माणिक ढोले, विवेक चडगुलवार आदी उपस्थित होते.
वेदाबाबत माहिती सांगताना माणिक गुट्टे म्हणाले, महर्षी व्यासाच्या ब्रह्मसूत्रातील ब्रह्मजिज्ञासा हे पहिले सूत्र आहे. ज्यांना वैराग्याची पूर्ण माहिती आहे व ज्यांचे अंत:करण व मन शुध्द आहे. तसेच लोक ब्रह्मजिज्ञासेचे अधिकारी होऊ शकतात. भारत देशात शुध्द अंत:करण असणारे अनेक साधूसंत व ऋषीमुनी खऱ्या अर्थाने ब्रह्मजिज्ञासाचे अधिकारी आहेत. मध्यंतरीच्या काळात वेदांबाबत अनेक भ्रांती म्हणजे, गैरसमज पसरविण्यात आले. ब्रह्माला जाणतात ते ब्राह्मण असतात. विकारद्वंद झाले, त्यांना शास्त्र व संस्कृतात ब्राह्मण म्हणतात. वेदाच्या संकल्पनेनुसार जातीनुसार ब्राह्मण नाही. वेदानुसार शुद्र म्हणजे, संस्कारविहिन असा संस्कृतात अर्थ आहे. वेद म्हणजे, ज्ञान असा शब्दश: अर्थ आहे, असेही गुट्टे म्हणाले.
भारतीय दर्शनामध्ये ज्ञानाचे विभाजन दोन प्रकरणात केले आहे. पहिले प्रकार म्हणजे, भौतिक ज्ञान व दुसरे अध्यात्मिक ज्ञान. भौतिक ज्ञानात प्रकृती ज्ञानाचा समावेश होतो. जे डोळ्याला दिसते अशा सर्व वस्तूबद्दलचे ज्ञानाचा यात समावेश होतो. सध्याच्या युगात भौतिक ज्ञानाची चिकित्सा, प्रचार व प्रसार मोठ्याप्रमाणात केल्या जात आहे. देशात अद्भूत शक्ती आहे. हे अध्यात्मिक ज्ञानात अंतर्भुत आहे. मनुष्याला सुखी जीवन जगण्यासाठी भौतिक व अध्यात्मिक ज्ञान असणे गरजेचे आहे. वेदात भेदभावाला स्थान नाही. त्यामुळे मनुष्यांनी विश्वरूप झाले पाहिजे. जात, धर्म, पंथ असा भेदभाव विसरून जीवन घालवावे, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)