ग्रामीण भागातही सर्वेक्षणाबाबत गोंधळाचीच स्थिती
By Admin | Updated: March 15, 2015 01:09 IST2015-03-15T01:09:41+5:302015-03-15T01:09:41+5:30
सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणावरील आक्षेप नोंदविण्यास ५ मार्चपासून सुरूवात झाली आहे.

ग्रामीण भागातही सर्वेक्षणाबाबत गोंधळाचीच स्थिती
धानोरा : सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणावरील आक्षेप नोंदविण्यास ५ मार्चपासून सुरूवात झाली आहे. मात्र बहुतांश गावांमध्ये सर्वेक्षणाच्या याद्या पोहोचल्याच नाही. १४ मार्चपर्यंत प्रत्येक गावात ग्रामसभा आयोजित करायची होती. मात्र यादी नसल्याने ग्रामसभा कशी घ्यायची, असा प्रश्न ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासमोर निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तारखेनुसार केवळ ३ एप्रिलपर्यंतच आक्षेप नोंदविता येणार आहेत. मात्र १० दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही याद्या प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे नागरिकांना आक्षेप नोंदविण्यास पुरेसा कालावधी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एक महिन्याचा कालावधी दिला होता. मात्र याद्या प्राप्त झाल्या नाही, ही प्रशासनाची चूक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आक्षेप नोंदविण्यासाठी मुदतवाढ करवून घ्यावी, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांकडून होत आहे. आक्षेपाशिवाय याद्यांना अंतिम स्वरूप दिल्यास भविष्यात फार मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)