लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : 'जलजीवन मिशन 'अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत अनेक गावांमध्ये लाखो रुपये खर्च करून नळ पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले. मात्र, कामात नियोजनशून्यता व देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक पाणी योजना बंद असल्याने ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जनतेला पिण्याचे पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन नळ योजनेच्या कामांना सुरुवात झाली. 'हर घर जल २०२४' संकल्पना आहे. यानुसार भारत सरकारने २०२४ सालापर्यंत सर्व कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पाणी देण्याचा सरकारचा मानस आहे. २०२४ पर्यंत काही ठिकाणची कामे पूर्ण न झाल्याने या योजनेच्या कामांना २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
सुरसुंडी अन् खांबाळातील योजना बंद, महिला त्रस्तगावालगत एक किमी अंतरावर वाहत असलेल्या भेद्री नदीवर सुरसुंडी व खांबाळा येथील नळ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. दोन वर्षापूर्वी नळ योजनेचे काम सुरू करण्यात आले. नळ योजना सुरू होण्यापूर्वीच गावात २ पाइपलाइन टाकून नळ घरोघरी पोहोचवण्यात आले. मात्र, पाणीपुरवठा बंद असल्याने घरोघरी पोहोचवण्यात आलेले नळ फुटून बहुतांशी नळांच्या तोट्या गायब झाल्या आहेत. खांबाळा येथील नळयोजनेचासुद्धा पाणीपुरवठा बंद आहे.
६४ लाख रुपयांचा खर्च पाण्याततब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर सुरसुंडी येथील नळयोजना सुरू करण्यात आली. मात्र, गावातील पाइपलाइन लिकेज होणे नेहमीची बाब झाली होती. दरम्यान, पंधरा ते वीस दिवसांत नळयोजना अचानक जुलै महिन्यात बंद पडली. ती आजतागायत सुरू झाली नाही. त्यामुळे तब्बल ६४ लाख खर्च करून कार्यान्वित करण्यात आलेली सुरसुंडीची नळयोजना सध्यातरी कुचकामी ठरली आहे.