सुधारित पुस्तके नाहीत
By Admin | Updated: January 14, 2015 23:07 IST2015-01-14T23:07:11+5:302015-01-14T23:07:11+5:30
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जवळपास ६६ व्यावसायिक कोर्सचा अभ्यासक्रम बदलला. तृतीय सेमिस्टर परीक्षा ९ फेब्रुवारीपासून होणार आहे. अभ्यासक्रम बदलून ६ महिन्याचा कालावधी

सुधारित पुस्तके नाहीत
आयटीआयचा अभ्यासक्रम बदलला : निगेटिव्ह मार्र्किं गमुळे निकाल घसरणार
गडचिरोली : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जवळपास ६६ व्यावसायिक कोर्सचा अभ्यासक्रम बदलला. तृतीय सेमिस्टर परीक्षा ९ फेब्रुवारीपासून होणार आहे. अभ्यासक्रम बदलून ६ महिन्याचा कालावधी उलटूनही सुधारित पुस्तके प्रकाशीत करण्यात आली नाही. त्यामुळे तोंडावर आलेल्या परीक्षेची तयारी कशी करावी, या विवंचनेत आयटीआय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सापडले आहेत. याशिवाय तृतीय सेमिस्टर परीक्षेला नकारात्मक गुणदान पद्धती असल्यामुळे या परीक्षेचा निकाल घसरण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात गडचिरोली जिल्हा मुख्यालयी व बाराही तालुकास्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विविध प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. याशिवाय रामगड, कोरची, खमनचेरू व जांभिया या शासकीय आश्रमशाळांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमाची सुविधा आहे. यापूर्वी आयटीआयच्या सर्व अभ्यासक्रमाची वर्षातून एकदा परीक्षा व्हायची. यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेचा समावेश होता. मात्र आयटीआयच्या मंडळाने सर्व अभ्यासक्रमासाठी जुलै २०१३ पासून सेमिस्टर परीक्षा पद्धती लागू केली. आतापर्यंत दोन सेमिस्टर परीक्षा आटोपल्या आहेत. फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या प्रथम सेमिस्टरचा गडचिरोली आयटीआयचा निकाल ९८ टक्के आहे. तर आॅगस्ट महिन्यात झालेल्या द्वितीय सेमिस्टर परीक्षेचा निकाल ५७ टक्के आहे. नकारात्मक गुणदान पद्धतीमुळे यापूर्वी द्वितीय सेमिस्टर परीक्षेचा गडचिरोली आयटीआयचा निकाल ३३ टक्के लागला होता. त्यानंतर नकारात्मक गुणदान पद्धतीत सूट देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून झाल्यानंतर शासनाने या पद्धतीस सवलत दिली. त्यामुळे गडचिरोली आयटीआयचा निकाल ५७ टक्के झाला.
तृतीय सेमिस्टर परीक्षेसाठी ग्रेस देण्यात येणार नसून नकारात्मक गुणदान पद्धती राहणार आहे. तीन उत्तरे चुकीचे सोडविल्यास योग्य उत्तरासाठी मिळालेल्या गुणातून एक गुण वजा होईल, असे आयटीआयच्या मंडळाने निश्चित केले आहे. आयटीआयचा अभ्यासक्रम बदलून सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांच्या हाती सुधारीत पुस्तके पडली नाही. जुन्या पुस्तकातील संदर्भाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना तयारी करावी लागत आहे. परीक्षेसाठी अनेक पुस्तके वाचावी लागत असल्याने विद्यार्थ्यांचा त्रास वाढला आहे. मंडळस्तरावर सुधारित पुस्तके तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
आयटीआयच्या अभ्यासक्रमाला सेमिस्टर परीक्षा पद्धती लागू केल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्याच्या आयटीआयचा निकाल घसरला. मात्र त्या मानाने गडचिरोली आयटीआयचा प्रथम व द्वितीय सेमिस्टर परीक्षेचा निकाल समाधानकारक लागला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)