११८ महाविद्यालयांत नियमित प्राचार्य नाही
By Admin | Updated: October 21, 2014 22:50 IST2014-10-21T22:50:30+5:302014-10-21T22:50:30+5:30
गोंडवाना विद्यापीठाच्या वसतिगृह व अन्य इमारतीसाठी ४० एकर जागा मंजूर झाली आहे. या जागेवर बांधकाम करण्यासाठी निधीही मिळाला आहे. मात्र सदर जागा शेतकऱ्यांची असल्यामुळे हे प्रकरण

११८ महाविद्यालयांत नियमित प्राचार्य नाही
विद्यापीठाला ४० एकर जागा मिळाली : प्रभारी कुलगुरूंची पत्रकार परिषदेत माहिती
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वसतिगृह व अन्य इमारतीसाठी ४० एकर जागा मंजूर झाली आहे. या जागेवर बांधकाम करण्यासाठी निधीही मिळाला आहे. मात्र सदर जागा शेतकऱ्यांची असल्यामुळे हे प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. मंजूर झालेली ४० एकर जागा विद्यापीठ प्रशासनाला हस्तांतरीत व्हायची आहे. या जागेवर मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात येणार असून पुढील सत्रांपासून १०० प्रवेश क्षमतेचे हे दोनही वसतिगृह सुरू होणार आहेत. तसेच गोंडवाना विद्यापीठांतर्गत एकूण २३१ महाविद्यालयांपैकी ११८ महाविद्यालयात नियमित प्राचार्य नाहीत, अशा महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना प्रभारी कुलगुरू डॉ. दीक्षित म्हणाले, आपण विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी रूजू झाल्यापासून महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्य यांच्याशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमावर भर दिला आहे. एकमेकांशी संवाद साधल्यानेच उच्च शिक्षणातील सर्व घटकांच्या अडीअडचणी निदर्शनास येतात. या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.दिवाळीनंतर ४ ते ५ सुसंवाद शिबिर घेण्यात येणार असून एका शिबिरात एकाचवेळी १०० प्राचार्य, प्राध्यापक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत चर्चा घडून येणार आहे. गोंडवाना विद्यापीठाला उच्च दर्जाचे विद्यापीठ बनविण्याचे आपले ध्येय असून विद्यापीठाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक सुधारणांची गरज आहे, असेही डॉ. दीक्षित यावेळी म्हणाले. सर्व विद्याशाखांच्या सेमिस्टर पद्धतीच्या परीक्षांचा निकाल वेळेवर घोषित करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे आता प्रत्येक विद्यार्थ्यांला त्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची झेरॉक्सही देण्यात येणार आहे. गोंडवाना विद्यापीठात प्रशिक्षित कर्मचारी कमी आहेत. सध्या उपलब्ध कर्मचाऱ्यांकडूनच काम करून घेण्यावर भर दिल्या जात आहे. आपण १० टक्के परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या सदस्यांची तसेच सिनेट सदस्यांची निवडणूक लवकरच घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ. दीक्षित यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)