आश्रमशाळा, वसतिगृहाच्या तब्बल १८ इमारती अपूर्ण
By Admin | Updated: June 19, 2016 01:18 IST2016-06-19T01:18:08+5:302016-06-19T01:18:08+5:30
आदिवासी विकास विभागामार्फत अहेरी, भामरागड व गडचिरोली या तिन्ही प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात एकूण ११ आश्रमशाळा व १२ वसतिगृह ....

आश्रमशाळा, वसतिगृहाच्या तब्बल १८ इमारती अपूर्ण
गती मंदावली : सचिवांनी व्यक्त केली नाराजी
गडचिरोली : आदिवासी विकास विभागामार्फत अहेरी, भामरागड व गडचिरोली या तिन्ही प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात एकूण ११ आश्रमशाळा व १२ वसतिगृह अशा एकूण २३ इमारतीचे काम प्रस्तावित करण्यात आले. यापैकी ५ इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. आश्रमशाळा व वसतिगृह बांधकामात गती नसल्याने आदिवासी विकास विभागाचे सचिव रामगोपाल देवरा यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.
आदिवासी विकास विभागाचे सचिव रामगोपाल देवरा यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आश्रमशाळा वसतिगृह बांधकाम तसेच आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नव्याने आश्रमशाळा व वसतिगृह इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळा व वसतिगृह इमारत बांधण्याच्या कामात गती फार कमी आहे, असे सचिव देवरा यावेळी म्हणाले. आश्रमशाळा व वसतिगृह इमारत बांधकामाला गती देऊन आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी सर्व इमारती हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देशही सचिव रामगोपल देवरा यांनी बैठकीत दिले.
ताडगाव, व्यंकटापूर, धानोरा, मोहली येथील आश्रमशाळा व वसतिगृहांच्या इमारती या आठवड्यात पूर्ण होतील, अशी माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी बैठकीत सचिव रामगोपाल देवरा यांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)