लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अखेर केंद्र शासनाकडून पीक विमा मंजूर होऊन राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर सोमवार, ११ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ कोटी ३८ लाख रुपये विमा रक्कम जमा करण्यात आली. सकाळी ११ वाजल्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांचा फोन मेसेजच्या ट्यूनने खणखणला.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा योजना होती. या योजनेंतर्गत जवळपास ९१ हजार विमा प्रस्ताव जिल्ह्यातून सादर करण्यात आले होते. दरम्यान, मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडला. तसेच पिकांवर रोगराईचे संकट आले नाही. मात्र, अवकाळी पाऊस व पुरामुळे पिकांची नासाडी झाली. पिकांची काढणी झाली असतानाच परतीचा अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावला गेला.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला व नुकसान झाल्यानंतर त्याची ऑनलाइन नोंद केली, अशा शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव मंजूर झाले; परंतु विमा रक्कम प्राप्त झाली नव्हती. उशिरा का होईना ही रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. पोळा सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे.
६,३५७ शेतकऱ्यांनी विम्यासाठी केला दावापीक नुकसानानंतर लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील ६ हजार ३५७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अॅपवर व ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात कंपनीकडे दावा केला होता. परंतु, २ हजार ५०० वर शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले. पीक नुकसानानंतर ७२ तासांच्या आत नुकसानाची नोंदणी मोबाइल अॅपवर करावी लागते. त्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करतात.
कधी होतो विमा मंजूर ?पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, कीड व रोग यामुळे उत्पादनात येणारी घट, यासाठी मदत मिळते.
१४ ऑगस्टपर्यंत पीक विमा नोंदवण्याची मुदत
- यंदाच्या खरीप हंगामात पिकांचा विमा उतरवण्याची मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी १४ ऑगस्टपर्यंत आहे तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अवधी आहे.
- यंदा सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून पिकांना सुरक्षा कवच द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
३,६५० यंदा जिल्ह्यात पीक विमा नोंदणीला अल्प प्रतिसादशेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीप पिकांच्या विम्याचा लाभमिळालेला आहे. त्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम वळती करण्यात आलेली आहे.