गडचिरोली : हृदय, मूत्रपिंड, यकृत यांसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी सध्या रुग्णांना १० ते २० लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. मात्र, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आता ही शस्त्रक्रिया मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने योजनेत मोठा बदल करीत अवयव प्रत्यारोपणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यारोपणासाठी रुग्णालयांना ५ लाख रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त लागणारा जादा खर्चही विशेष निधीतून भरला जाणार आहे.
खासगी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपणाचा खर्चअ) किडनी प्रत्यारोपण : ८ ते १० लाखब) यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण : १५ ते २० लाखक) हृदय प्रत्यारोपण : १८ ते २५ लाखड) कॉर्निया प्रत्यारोपणः अंदाजे १.५ लाख
आवश्यक कागदपत्रेरुग्ण तपासणीचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल, रूग्णाचा आधारकार्ड, रेशनकार्ड, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदीसह विविध दस्तावेज प्रस्तावासोबत जोडावे लागतात. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाच्या वतीने मंजूर केला जातो.
मोठ्या शहराकडे धावगडचिरोली येथील सदर योजनेशी संलग्न रुग्णालयांमध्ये अस्थीच्या विविध शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जात असल्या तरी, इतर अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी नागपूरला जावे लागते.
उपचार प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइनउपचार प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन करण्यात आली आहे. योजनेचा सर्व खर्च राज्य सरकारकडून थेट रुग्णालयांना दिला जाणार असून, रुग्णालयांना बिल मंजूर झाल्यानंतर एका महिन्याच्या आत निधी मिळेल. यामुळे रुग्णालयांची भागीदारी वाढण्याची शक्यता निर्माण होणार आहे. अधिक खासगी रुग्णालये योजनेत सहभागी व्हावीत म्हणून उपचार दर वाढवण्याचा प्रस्तावही आहे. रुग्णालयांना प्रत्येक महिन्याला मंजूर बिले आणि निधी मिळणार आहे.
"शेकडो रुग्णांना दरवर्षी अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते; मात्र, यासाठी बराच खर्च येतो. महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणाचा समावेश झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. टोटल हिप रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या गडचिरोलीत पार पडल्या."- डॉ. सुमेधबोधी चाटसे, वरिष्ठ जिल्हा समन्वयक, प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजना