अतिक्रमित एकतानगर झोपडपट्टीवर प्रशासनाने पुन्हा चालविला बुलडोजर; अनेक झोपड्या उद्ध्वस्त
By दिलीप दहेलकर | Updated: June 21, 2023 15:51 IST2023-06-21T15:50:11+5:302023-06-21T15:51:17+5:30
प्रकरण न्यायप्रविष्ठ तरीही केली कारवाई

अतिक्रमित एकतानगर झोपडपट्टीवर प्रशासनाने पुन्हा चालविला बुलडोजर; अनेक झोपड्या उद्ध्वस्त
गडचिरोली : शहराच्या गाेकुलनगरातील देवापूर रिठ सर्वे नंबर ७८ व ८८ येथील तलावातील अतिक्रमीत एकतानगर झोपडपट्टीबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू आहे. अतिक्रमणधारकांनी आपल्या न्याय हक्कासाठी न्यायालयात रिठ याचिका दाखल केली असून याबाबतच्या सुनावण्या सुरू आहेत. दरम्यान नगर परिषद प्रशासनाने तगड्या बंदोबस्तात २१ जुन राेजी बुधवारला सकाळच्या सुमारास सदर झोपडपट्टीवर बुलडोजर चालविला.
दरम्यान जेसीबी, पोकलॅन्ड, ट्रॅक्टर, अग्निशमन दल तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांसह पाोलिस बंदोबस्त व प्रशासनाचा प्रचंड फौजफाटा येथे दाखल झाला. येथील झोपड्या बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आल्या. दरम्यान कवेलू, फाटे व इतर साहित्यांची नासधूस झाली. काही अतिक्रमणधारकांनी कसेबसे आपले संसारपयोगी साहित्य बाहेर काढले. तर काही जणांना असे साहित्य काढण्याची संधीही मिळाली नाही.