जिल्ह्यात साथरोगांचे थैमान
By Admin | Updated: September 2, 2014 23:46 IST2014-09-02T23:46:18+5:302014-09-02T23:46:18+5:30
जिल्ह्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून यामुळे नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू साथ रोगांनी झाला असल्याची शक्यता

जिल्ह्यात साथरोगांचे थैमान
गडचिरोली : जिल्ह्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून यामुळे नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू साथ रोगांनी झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील नागरिकांच्या मृत्यूची नोंद व्यवस्थित होत नसल्याने प्रशासनाकडे साथ रोगांनी झालेल्या मृत्यूचा आकडा कमी नोंदविण्यात आला आहे.
आरमोरी तालुक्यांतर्गत येत असलेल्या बोरी येथील तीन वर्षीय बालिका मागील आठवड्यात डेंग्यू आजाराने दगावली. मात्र याबाबतची नोंद शासकीय दप्तरात करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली तालुक्यात साथीच्या आजाराने पाच रूग्ण दगावले. त्याचबरोबर कुरखेडा तालुक्यातील दोन व चामोर्शी तसेच धानोरा तालुक्यातील प्रत्येक एका रूग्णाचा मृत्यू झाला.
गडचिरोली तालुक्यात विश्रामपूर येथील दोन नागरिकांचा हिवतापाने मृत्यू झाला. साखरा येथे एका जणाचा मृत्यू झाला. आंबेशिवणी येथील दोन रूग्णांचा हिवतापाने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मागील वर्षी कुरखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. शेकडो नागरिकांना साथ रोगाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कोरची, भामरागड, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमधील दुर्गम भागामध्ये नेहमीच साथीचे रोग पसरतात. मात्र बहुतांश नागरिक रूग्णालयामध्ये न जाता गावठी उपचार करतात. उपचाराला उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू होतो. मात्र त्याची नोंद दवाखान्यामध्ये राहत नाही. त्यामुळे एखाद्या रोगाने मृत्यू झाला असल्याची आकडेवारी नेहमीच कमी राहत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्याला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण अजूनही सुटलेले नाही. यापासून आरोग्य विभागसुद्धा अपवाद नाही. आरोग्य विभागातील जवळपास ३० टक्के पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तर नेहमीच वानवा असल्याचे दिसून येते. जे कर्मचारी कार्यरत आहेत. ते सुद्धा व्यवस्थित काम करीत नाही. तालुका किंवा जिल्हा मुख्यालयी राहून जवळपास ५० किमीच्या अंतरावर सेवा देतात. ये- जा करण्यातच त्यांचा बराचसा कालावधी जातो. त्यामुळे रूग्ण खाटेवरच तडफडत राहतो. ही जिल्ह्यातील सत्य परिस्थिती असली तरी रूग्णांची नोंद नसल्याने त्याची परिणामकारकता दिसून येत नाही. (नगर प्रतिनिधी)