सुरजागड प्रकल्पासाठी थाळीनाद आंदोलन
By Admin | Updated: March 7, 2017 00:49 IST2017-03-07T00:49:01+5:302017-03-07T00:49:01+5:30
सुरजागड लोहप्रकल्पासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी समिती व सुरजागड बचाव संघर्ष समिती ...

सुरजागड प्रकल्पासाठी थाळीनाद आंदोलन
निवेदन सादर : सुरजागड बचाव समितीचा पुढाकार
एटापल्ली : सुरजागड लोहप्रकल्पासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी समिती व सुरजागड बचाव संघर्ष समिती तसेच पेसा, ग्रामसभा, अहेरी जिल्हा कृती समिती ता. एटापल्ली यांच्या मार्फत एटापल्ली येथील शिवाजी चौक ते तहसील कार्यालयात थाळीनाद आंदोलन सोमवारी करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जनहितवादी समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांनी केले.
सुरजागड परिसरातून लोहखनिज उत्खननासाठी ग्रामसभा व तालुक्यातील जनतेला विश्वासात घ्यावे, सुरजागड लोहप्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीची जागृती करावी, या परिसरातील जनतेला गौण वनोपजाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र सुरजागड लोहप्रकल्प झाल्यास हा रोजगार नष्ट होणार आहे. त्यामुळे सुरजागड प्रकल्प उभारताना होणाऱ्या नुकसानीची भरपाई व व्यवस्थापन करण्यासंदर्भात तरतुदी होणे आवश्यक आहे. जंगलातील वन्यजीवांचे वास्तव्य धोक्यात येणार नाही.
याकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे. क्रश व स्टील प्लॅन्ट एटापल्ली, भामरागड, आलापल्ली तसेच अहेरी परिसरात उभारण्यात यावा, लोहप्रकल्प, क्रश प्लॅन्ट व स्टिल प्लॅन्टमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावे, लोहप्रकल्पातून जमा होणाऱ्या एकूण रॉयल्टीपैकी सात टक्के रॉयल्टी दुर्गम भागाच्या विकासाकरिता खर्च करावी, आदी मागण्यांसाठी थालीनाद आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)