जिल्ह्यातील ६२३ पालकांनी केली पाठ्यपुस्तके शाळेला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST2021-05-09T04:38:21+5:302021-05-09T04:38:21+5:30
गडचिराेली : समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी माेफत पाठ्यपुस्तके दिली जातात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी ...

जिल्ह्यातील ६२३ पालकांनी केली पाठ्यपुस्तके शाळेला परत
गडचिराेली : समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी माेफत पाठ्यपुस्तके दिली जातात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पाठ्यपुस्तके शाळेला परत करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले हाेते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जवळपास ६२३ पालकांनी आतापर्यंत शाळेला पाठ्यपुस्तके परत केली आहे.
पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर २०२० राेजी शासन निर्णय निर्गमित केला. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची जपनूक याेग्यरितीने करतात. त्यांना सुस्थितीत ठेवतात. अशा पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केल्यामुळे पुढील वर्षी फेरवाटप करणे शक्य हाेते. शिवाय पुनर्वापरामुळे काही प्रमाणात कागदाची बचत हाेते. हा उद्देश ठेवून शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये प्रायाेगिक तत्त्वावर पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार शाळा व गटसाधन केंद्राच्या वतीने कार्यवाही सुरू आहे.
कागदाच्या बचतीतून हाेणार झाडांचे संवर्धन
n गडचिराेली जिल्ह्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यात वाटप केलेल्या एकूण पाठ्यपुस्तकांपैकी २० टक्के पाठ्यपुस्तक जमा करून त्याचा पुनर्वापर करण्याचे नियाेजन आहे. तसे शासनाचे आदेशही आहेत. गडचिराेली जिल्ह्यात जि.प., न.प. व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण १ लाख १० हजार विद्यार्थ्यांना माेफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली आहेत.
n १ लाख १० हजार पाठ्यपुस्तकांच्या संचापैकी २० टक्के पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापर हाेणार आहे. त्यामुळे यंदा जि. प. प्रशासनाच्या वतीने शासनाकडे माेफत वाटप करण्यासाठी यंदा ९० हजारांच्या आसपास पाठ्यपुस्तकांच्या संचाची मागणी करण्यात येणार आहे, तसे नियाेजन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
काेट...
माझा मुलगा तिसऱ्या वर्गात आहे. आता चाैथीत गेला आहे. शिक्षकांनी सांगितल्यानुसार आम्ही माेफत मिळालेल्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकांचा संच शिक्षकांकडे शाळांमध्ये जमा केला आहे. इतर पालकांनीही पाठ्यपुस्तके जमा करावीत.
- पंढरी उंदीरवाडे
...................
पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराबाबतची माहिती मुलीकडून मिळाली आहे. कामात व्यस्त असल्यामुळे पुस्तके परत केली नाही. येत्या सात-आठ दिवसांत गुरूजींकडे इयत्ता पाचवीचे पुस्तके परत करणार आहे.
- शिवराम चुधरी
.............
शासनाच्या धाेरणानुसार पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापर करण्याकरिता पाठ्यपुस्तके जमा करण्याबाबत सर्व पं.स.च्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना ४ फेब्रुवारी २०२१ राेजी पत्र पाठवून पाठ्यपुस्तके जमा करण्यास सांगितले हाेते. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. पालक पुस्तके जमा करीत असून २० टक्के पुस्तकांचा पुनर्वापर हाेणार आहे.
- राजू आकेवार, शिक्षण विस्तार अधिकारी, जि. प. गडचिराेली