पाठ्यपुस्तके उपलब्ध
By Admin | Updated: May 17, 2017 01:17 IST2017-05-17T01:17:07+5:302017-05-17T01:17:07+5:30
२०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वी प्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.

पाठ्यपुस्तके उपलब्ध
चामोर्शीत पुस्तके पोहोचली : सर्व शिक्षा अभियानाचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वी प्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाभरात दोन हजार शाळा आहेत. या शाळेतील १ लाख २० हजार ४२४ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे. विभागीय कार्यालयातून तालुकास्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तकांचा पुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे. सर्वप्रथम चामोर्शी तालुक्याला पुस्तके पुरविण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याला एक दिवस या प्रमाणे पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत १ ते ८ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. एक महिन्यापूर्वी पाठ्यपुस्तकांचे वितरण न करता पाठ्यपुस्तकांची रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्याचे निर्देश शिक्षकांना देण्यात आले होते. मात्र दोन महिन्याच्या कालावधीत सर्वच विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे शक्य होणार नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट लाभ योजनेतून पाठ्यपुस्तक योजनेला वगळले व पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचा निर्णय १५ दिवसांपूर्वी घेतला.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावेत, यासाठी शिक्षण विभागाच्या मार्फतीने नियोजन केले आहे. पाठ्यपुस्तक हे वितरण संबंधिच्या सर्व स्पष्ट सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापकांकडून लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार २०१६-१७ या वर्षात मराठी माध्यमाच्या १ लाख १४ हजार ११५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. इंग्रजी माध्यमांच्या गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ आश्रमशाळा आहेत. यामध्ये एकूण ४५६ विद्यार्थी आहेत. हिंदी माध्यमांच्या १४ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण २ हजार ६५८ विद्यार्थी आहेत. उर्दू माध्यमाच्या पाच शाळा आहेत. यामध्ये एकूण २५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत.
प्रत्येक तालुक्यात जवळपास पाच हजार लाभार्थी आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्याला जवळपास ट्रकभर पुस्तके लागणार आहेत. दरदिवशी एक तालुका या प्रमाणे पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. सर्वप्रथम ही पुस्तके तालुकास्तरावर उपलब्ध करून दिली आहेत. त्यानंतर मुख्याध्यापक पुस्तके शाळांमध्ये घेऊन जाणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. मंगळवारी चामोर्शी येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तके उपलब्ध झाली. गट शिक्षणाधिकारी दीपक देवतळे यांच्या सुचनेनुसार विषय साधनव्यक्ती कालिदास कुनघाडकर, वंदना चलाख, सरलक्ष्मी यामसणी, जीवन शेट्टे, सुशील गजघाटे, विकास गायधने, वरिष्ठ लिपीक अरूण अनकमवार यांनी पुस्तके उतरविण्यास मदत केली.
मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली
२७ जून पासून गडचिरोली जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध व्हावी, या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन करून शाळा सुरू होण्यास आणखी सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाही तालुकास्तरावर पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. तालुकास्तरावरून ती पुस्तके शाळास्तरावर घेऊन जाणे ही त्या शाळेतील मुख्याध्यापकांची सर्वस्वी जबाबदारी राहणार आहे. पहिल्या दिवशी पुस्तके उपलब्ध झाली नाही, अशी तक्रार एखाद्या पालकाने केल्यास त्यासाठी संबंधित मुख्याध्यापकाला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
थेट लाभ योजना लांबणीवर
थेट लाभ योजनेंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण न करता तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र याला शिक्षण विभागातूनच प्रचंड विरोध होऊ लागला. विद्यार्थ्यांचे बँक खाते निघाले नाही तर तो विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल. त्यामुळे विद्यार्थ्याला पुस्तकांविनाच शाळेमध्ये यावे लागेल. त्याचबरोबर एखाद्या पालकाने पाठ्यपुस्तकांचे पैसे बँकेतून काढून इतर कामांवर खर्च केल्यास पैसे मिळूनही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहण्याचा धोका होता. मे महिन्यापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे व त्याची माहिती शिक्षण विभागाला देणे अशक्य असल्यानेही थेट लाभ योजनेतून पाठ्यपुस्तके वगळण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.