वीजजोडणी घेण्याकडे मंडळाची पाठ

By Admin | Updated: September 20, 2015 01:53 IST2015-09-20T01:53:07+5:302015-09-20T01:53:07+5:30

महावितरणच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीजजोडणी व वीजदर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

The text of the board to take electricity connection | वीजजोडणी घेण्याकडे मंडळाची पाठ

वीजजोडणी घेण्याकडे मंडळाची पाठ

गणेशोत्सवासाठी : जिल्ह्यात केवळ ३० मंडळांनीच घेतली अधिकृत वीजजोडणी
गडचिरोली : महावितरणच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीजजोडणी व वीजदर उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे असतानाही जिल्ह्यातील एकूण ४०९ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ ३० मंडळांनीच महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. अधिकृत वीज जोडणीसाठी मंडळांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात महावितरणचे गडचिरोली व अहेरी दोन विभाग आहे. तर १२ तालुकास्तरावर १२ उपविभाग आहेत. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार अहेरी उपविभागांतर्गत आठ, चामोर्शी उपविभागांतर्गत सात, सिरोंचा उपविभागांतर्गत दोन, गडचिरोली उपविभागांतर्गत नऊ, देसाईगंज उपविभागांतर्गत चार अशा एकूण ३० सार्वजनिक गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. उर्वरित ३७९ सार्वजनिक गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेतली नसल्याची माहिती मिळाली आहे. महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी न घेतलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, आरमोरी, धानोरा, कुरखेडा व कोरची वीज उपविभागाच्या हद्दीत असलेल्या मंडळाचा समावेश आहे.
भरारी पथकाकडून कारवाई होणार का?
उत्सव काळात वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरणच्या वतीने दामिनी नावाच्या भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सदर पथकातील अधिकारी आता जिल्हाभरात फिरून कोणते सार्वजनिक गणेश मंडळ अनाधिकृत वीज पुरवठ्याचा लाभ घेत आहेत. हे शोधणार आहेत. अनाधिकृत वीज घेतलेल्या सार्वजनिक गणेश मंडळावर भरारी पथक कारवाई करणार काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
‘महावितरण गणपती मंडळांच्या दारी’ मोहीम सुरू
गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून होणारी वीज चोरी रोखण्यासाठी गडचिरोली येथील महावितरणच्या वतीने ‘महावितरण गणपती मंडळाच्या दारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जात आहे. सोबतच गणेश मंडळाच्या वीज पुरवठ्याची तपासणी सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Web Title: The text of the board to take electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.