महिनाभरापासून दहशत, तीन महिलांचा बळी ! नागरिकांच्या आंदोलनानंतर बिबट अखेर जेरबंद
By गेापाल लाजुरकर | Updated: December 11, 2025 19:11 IST2025-12-11T19:10:10+5:302025-12-11T19:11:04+5:30
Gadchiroli : आरमोरी वन परिक्षेत्रातील इंजेवारी, देऊळगाव परिसरात दहशत निर्माण करून सलग तीन महिलांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने गुरूवार, ११ डिसेंबर राेजी सकाळी जेरबंद केले.

Terror for a month, three women killed! Leopard finally captured after citizens' protest
गडचिराेली : आरमोरी वन परिक्षेत्रातील इंजेवारी, देऊळगाव परिसरात दहशत निर्माण करून सलग तीन महिलांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने गुरूवार, ११ डिसेंबर राेजी सकाळी जेरबंद केले. बिबट्यास बेशुद्ध करून पिंजऱ्यात कैद करण्यात आले. बिबट्याचा बंदोबस्त करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
आरमोरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या इंजेवारी व देऊळगाव परिसरात गत महिनाभरापासून बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. सदर बिबट्याने महिनाभरात देऊळगाव येथील दोन व इंजेवारी येथील एक अशा तीन महिलांना ठार केले, तसेच अनेक पाळीव जनावरांचाही बळी घेतला होता. बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा ह्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी ६ डिसेंबर राेजी देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन केले होते. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे आदेश प्राप्त झाले. तेव्हापासून आरमाेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण बडोले यांच्या नेतृत्वात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी व गडचिरोली येथील जलद बचाव पथक हे सर्च ऑपरेशन राबवत होते. अखेर गुरूवारी सकाळी गडचिराेली येथील जलद बचाव पथकाने बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. जेरबंद केलेल्या बिबट्याची तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल टोंगे यांनी करून नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालय व वन्यप्राणी बचाव केंद्र येथे हलविण्यात आले.
बचाव पथकाची धाडसी कारवाई
ड्रोन व ट्रॅप कॅमेऱ्याने बिबट्याच्या हालचाली टिपताच जलद बचाव पथक तत्काळ सक्रिय झाले. त्यानंतर सावधपणे त्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण बडोले, रवींद्र चौधरी, जीवशास्त्रज्ञ ललित उरकुडे, जलद बचाव पथकातील अजय कुकडकर, भाऊराव वाढई, मकसूद सय्यद, निखिल बारसागडे, कुणाल निमगडे व गुणवंत बाबनवाडे सहभागी झाले होते. बचाव पथकाने धाडसी कारवाई केली.