मर्जीतल्या कंत्राटदाराला दिले तेंदू युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 01:13 IST2017-04-24T01:13:11+5:302017-04-24T01:13:11+5:30
पेसा अधिनियम व शासन निर्णयानुसार जाहीर लिलाव प्रक्रिया राबवून तेंदू युनिट विकणे ग्रामसभांना बंधनकारक आहे.

मर्जीतल्या कंत्राटदाराला दिले तेंदू युनिट
कोरची तालुका : ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिसांकडे धाव
कोरची : पेसा अधिनियम व शासन निर्णयानुसार जाहीर लिलाव प्रक्रिया राबवून तेंदू युनिट विकणे ग्रामसभांना बंधनकारक आहे. मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी कोरची क्षेत्रातील काही लोकांनी जाहिरात न देता महाग्रामसभा स्थापन करून व कंत्राटदारांशी संगणमत करून खास कंत्राटदारांना तेंदू युनिट विकले. त्यामुळे ग्रामसभांना अत्यल्प किंमत मिळाली. या प्रकाराची तक्रार काही ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी १२ मार्च रोजी कोरची पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र खास कंत्राटदार व महाग्रामसभांचे वजन अधिक असल्याने पोलिसांनीही या तक्रारीची दखल घेतली नाही.
पेसा अधिनियम व शासन निर्णयानुसार तेंदू युनिट विक्रीचा अधिकार ग्राम पंचायतीअंतर्गत ग्रामसभांना देण्यात आला आहे. कोरची तालुक्याची भौगोलिकदृष्ट्या कोरची व कोटगूल अशा दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील एकूण १२५ गावांपैकी ८१ गावे कोरची परिसरात तर ४४ गावे कोटगूल क्षेत्रात समाविष्ट आहेत. कोटगूल क्षेत्रातील कोटगूल, मोठा झेलिया, पिटेसूर, कोसमी क्र. २, नांगपूर व सोनपूर या ग्रा. पं. अंतर्गत ४४ गावांच्या ग्रामसभांनी वृत्तपत्रात रितसर जाहिरात देऊन तेंदू युनिटची लिलाव प्रक्रिया राबविली. यात ग्रामसभांना प्रती गोणी ११ हजार ते १४ हजार ७२५ असा दर तेंदू युनिटवर मिळाला.
मात्र कोरची क्षेत्रातील काही लोकांनी महाग्रामसभा स्थापन केली. कंत्राटदारांना बोलावून त्यांच्याशी संगणमत करून वृत्तपत्रात कुठल्याही प्रकारची जाहिरात न देता प्रत्यक्ष कंत्राटदाराला कोरची क्षेत्रातील ८१ गावांमधील तेंदू युनिट देण्याचे ठरविले. त्यानुसार टेंभली, कालापाणी युनिटमध्ये ८०९ रूपये, बेडगाव युनिटमध्ये २ हजार ९१, बेतकाठी युनिटचे ८ हजार १२१, मसेली युनिटचे ७ हजार २०, मर्केकसा -४ हजार ८०० तर नवेझरी युनिटला ७ हजार २० रूपये प्रती गोणी असा दर देण्याचे ठरले. कंत्राटदार व महाग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच हा सौदा झाला. यावर मसेली, मुरकुटी व बोदालदंड ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी हा सौदा आम्हाला मान्य नसल्याचे सांगून त्याविरोधात एकत्र आले. या प्रकाराची तक्रार कोरची पोलीस ठाण्यात ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी दाखल केली. मात्र अद्यापही कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. कंत्राटदार व महाग्रामसभेच्या संगणमतामुळे आमच्या ग्रामसभांच्या तेंदू युनिटला अत्यल्प भाव मिळाला, त्यामुळे आर्थिक नुकसान झाले, असे निवेदनात म्हटले आहे. चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मार्च महिन्यातच जंगलाला लागली आग
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुट कटाईचे काम करण्यात आले. त्यानंतर अगदी काही दिवसातच कोरची तालुक्यातील जंगलाला आगी लागण्यास सुरूवात झाली. तेंदूची लहान रोपटे आगीत जळाल्यानंतर त्याला बुंध्यापासून नवीन पालवी फुटते. यातून मिळणारा तेंदूचा दर्जा अतिशय चांगला असतो. त्याचबरोबर पानेही अधिक येतात, असा गैरसमज नागरिक व तेंदू कंत्राटदाराचा झाला असल्याने जंगलाला आगी लावण्याचे प्रमाण वाढत आहे. आगी लावण्यासाठी तेंदू कत्राटदारच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.