तेंदू कंत्राट भ्रष्टाचाराची राज्यपालांकडे तक्रार
By Admin | Updated: February 26, 2017 01:54 IST2017-02-26T01:54:22+5:302017-02-26T01:54:22+5:30
जिल्ह्यातील कोरची व कुरखेडा तालुक्यातील तेंदूपाने युनिटच्या ग्रामसभांमार्फत विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला

तेंदू कंत्राट भ्रष्टाचाराची राज्यपालांकडे तक्रार
७ हजार ५०० रूपयांत विक्री : कुरखेडा-कोरची तालुक्याच्या ग्रामसभांतील प्रकार
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची व कुरखेडा तालुक्यातील तेंदूपाने युनिटच्या ग्रामसभांमार्फत विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार कुरखेडा, कोरची तालुका आदिवासी समितीच्या वतीने राज्यपाल डॉ. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक तथा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरची तालुक्यातील कोरची, मसेली, बेतकाठी, नवेझरी, पड्यालजोग, बेळगाव, कुरखेडा तालुक्यातील दादापूर, पुराडा, शिवणी, रानवाही, सोनसरी, अंगारा, मालेवाडा या तेंदूपत्ता विल्हेवाटीमध्ये प्रचंड प्रमाणात गैरप्रकार झाला असून येथील ग्रामसभांना ७ हजार ५०० रूपये प्रती गोणीप्रमाणे गोंदिया व वडसा येथील ठेकेदारांना दलालाच्या माध्यमातून देण्यात आले. या दलालांमध्ये कोरची व कुरखेडा येथील पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित गावातील ग्रामसेवक, राजकीय नेते, ग्रामसभांचे अध्यक्ष, सचिव जबाबदार आहेत, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारात तीन कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल संबंधित लोकांची मर्जी संपादन करण्यासाठीच झाली असून केवळ ७ हजार ५०० रूपयांत या गावातील तेंदूपत्ता कंत्राट देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवता ग्रामसभांचे ठराव पारित करून ही प्रक्रिया रेटून नेण्यात आली, असे राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातच पोटेगाव, खुटगाव येथील तेंदू युनिटचा लिलाव प्रती गोणी १४ हजार रूपये प्रमाणे झालेला असताना कुरखेडा, कोरची तालुक्यात आदिवासींची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रक्रियेत सहभागी असलेल्या कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, कोरची व कुरखेडा तालुक्यातील लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)