तेलगणाच्या आमदारांनी घेतली माजी आमदारांची भेट
By Admin | Updated: November 13, 2015 01:24 IST2015-11-13T01:24:54+5:302015-11-13T01:24:54+5:30
तेलंगणाच्या कागजनगरचे आ. कानेरू कोनप्पा यांनी गुरूवारी अहेरीचे माजी आ. दीपक आत्राम यांच्याशी वांगेपल्ली पुलाच्या निर्मितीसह विविध मुद्यांवर चर्चा केली.

तेलगणाच्या आमदारांनी घेतली माजी आमदारांची भेट
अनेक मुद्यांवर चर्चा : उद्योगांसह रोजगार निर्मितीची व्यक्त केली आशा
आलापल्ली : तेलंगणाच्या कागजनगरचे आ. कानेरू कोनप्पा यांनी गुरूवारी अहेरीचे माजी आ. दीपक आत्राम यांच्याशी वांगेपल्ली पुलाच्या निर्मितीसह विविध मुद्यांवर चर्चा केली. सदर पुलाच्या निर्मितीमुळे तेलंगणातील प्रगत व गडचिरोली जिल्ह्यातील मागास भागात उद्योग निर्मिती होऊन या भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, अशी आशा मान्यवरांनी भेटीदरम्यान व्यक्त केली.
वांगेपल्लीजवळ पुलाची निर्मिती व्हावी याकरिता आपण दीपक आत्राम आमदार असताना दोनदा स्वत: भेट घेतली. दीपक आत्राम यांचे सहकार्य व तेलंगणा सरकारचा पुढाकार यातून वांगेपल्ली पुलाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेले जाणार आहे. या आंतरराज्यीय पुलामुळे हैदराबाद, मंचेरिअलसारख्या प्रगत भागाचा गडचिरोली जिल्ह्यातील मागास भागाशी संपर्क येऊन या भागाचा विकास होण्यास मदत होईल, असा आशावाद आ. कानेरू कोनप्पा यांनी व्यक्त केला.
आपल्या आमदारकीच्या काळात या पुलाच्या निर्मितीसाठी राज्य व केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. आ. कोनप्पा यांची पहिल्यांदा नदीपात्रातच भेट घेतलो. या पुलाची निर्मिती म्हणजे, माझी स्वप्नपूर्ती आहे, असे प्रतिपादन आ. दीपक आत्राम यांनी केले. दरम्यान आ. कोनप्पा यांचा माजी आ. दीपक आत्राम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)