तहसीलदार आता प्रशासकपदी नियुक्त होणार
By Admin | Updated: March 26, 2015 01:28 IST2015-03-26T01:28:01+5:302015-03-26T01:28:01+5:30
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने तालुका...

तहसीलदार आता प्रशासकपदी नियुक्त होणार
कोरची : महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगर परिषद तसेच नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात प्राथमिक उध्दोषणा १ मार्च २०१४ रोजी निर्गमित करण्यात आली आहे. याच अनुषंगाने राज्याच्या नगर विकास विभागाने १२ मार्च २०१५ रोजी नवा निर्णय घेतला आहे. यानुसार नवनिर्मिती नगर परिषद व पंचायतीच्या प्रशासकपदी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
नगर परिषद, नगर पंचायती अधिनियमाच्या तरतुदीनुसार नगर पंचायत या स्वराज्य संस्थेची यथोचित रचना होईपर्यंतच्या कालावधीत नगर परिषद व नगर पंचायतीशी संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. नगर परिषद व नगर पंचायती स्थापन करण्यात आल्यानंतर ३४० (२) (१) कलमामधील तरतुदीनुसार संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
नवनिर्मित नगर परिषद व नगर पंचायतीच्या प्रशासकपदी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी विहीत करण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी खातरजमा करावे, असेही १२ मार्च २०१५ रोजी नगर विकास विभागाने घेतलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. तालुक्याच्या तहसीलदारांना प्रशासकपदी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्यात नव्या न. प. व नगर पंचायती निर्मितीच्या हालचालींना प्रशासकीय वर्तुळात वेग आला असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)