महिलांनी आत्मसात केले रेशीम धागा निर्मितीचे तंत्र
By Admin | Updated: June 28, 2017 02:24 IST2017-06-28T02:24:22+5:302017-06-28T02:24:22+5:30
आरमोरी तालुक्यातील वडधा येथून एक किमी अंतरावर असलेल्या बोरी चक येथील ७० महिलांनी रेशीम धागा निर्मितीचे

महिलांनी आत्मसात केले रेशीम धागा निर्मितीचे तंत्र
बोरी चक येथे प्रशिक्षण : ७० महिला स्वावलंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
वडधा : आरमोरी तालुक्यातील वडधा येथून एक किमी अंतरावर असलेल्या बोरी चक येथील ७० महिलांनी रेशीम धागा निर्मितीचे तंत्र आत्मसात केले आहे. त्यामुळे सदर महिला स्वावलंबी होण्यास मदत झाली आहे.
आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते. हा व्यवसाय तालुक्यातील विशेत: ढिवर समाजाचे नागरिक करीत आहेत. या व्यवसायात प्रामुख्याने पुरूषवर्ग काम करीत होता. मात्र रेशीम धागा निर्मितीचे काम महिला चांगल्या पद्धतीने करू शकत असल्याची बाब कृषी व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व रेशीम कार्यालय, आरमोरी यांच्या लक्षात आल्यानंतर दोन्ही विभागांनी बोरी चक येथे महिलांना दोन दिवसीय रिलिंग प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणातून महिलांनी रेशीम धागा कशापद्धतीने तयार करावा, याचे तंत्र विकसित केले. यामध्ये ७० महिलांनी सहभाग घेतला होता. रेशीमच्या माध्यमातून किमान आठ महिने रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
रेशीम प्रशिक्षणाप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक पेटकर, कृषी अधिकारी ढोले, केंद्रप्रमुख जीवने, रिलिंग प्रमुख जिवतोडे, वाघमारे, पोलीस पाटील सागर खेवले, ढिवर समाज संस्थेचे अध्यक्ष किशोर मेश्राम उपस्थित होते.