मगरीच्या बंदोबस्तासाठी टीम येणार
By Admin | Updated: October 29, 2014 22:48 IST2014-10-29T22:48:53+5:302014-10-29T22:48:53+5:30
येथील गोरजाई मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या महादेव तलावात गेल्या १५ दिवसांपासून मगरीचे वास्तव्य आहे. सदर मगर पुराच्या पाण्याने पावसाळ्यात या महादेव तलावात व बोटेबोळीत पोहोचली असावी,

मगरीच्या बंदोबस्तासाठी टीम येणार
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात हलविणार
वैरागड : येथील गोरजाई मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या महादेव तलावात गेल्या १५ दिवसांपासून मगरीचे वास्तव्य आहे. सदर मगर पुराच्या पाण्याने पावसाळ्यात या महादेव तलावात व बोटेबोळीत पोहोचली असावी, असा अंदाज आहे. या मगरीच्या बंदोबस्तासाठी वनविभागाच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची वन्य जीव संरक्षण टीम उद्या गुरूवारी वैरागडात दाखल होणार आहे.
वैरागडच्या महादेव तलावात गेल्या अनेक दिवसांपासून मगरीचे वास्तव्य असल्याची माहिती वडसा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला दिली. त्यामुळे आता ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पातील प्रशिक्षीत चमू गुरूवारी वैरागडमध्ये दाखल होणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. वन्यजीव संरक्षण चमू दाखल झाल्यानंतर महादेव तलावातील मगरीला ताडोबा येथील मगर प्रजनन केंद्रात हलविण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक वनपरिक्षेत्राधिकारी बी. एन. चिड यांनी लोकमतला दिली आहे. वन्यजीव निरिक्षक महेंद्रसिंग चव्हाण यांनी आज बुधवारी वैरागड येथे येऊन मगरीचे वास्तव्य असलेल्या महादेव तलावाची पाहणी केली. सध्या या ठिकाणी वनविभागाच्यावतीने वनमजुरामार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून महादेव तलाव व गोटेबोडी परिसरात मगरीचे वास्तव्य असल्याने या परिसरातील मासेमार व शिंगाडे उत्पादकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावानजिक असलेल्या महादेव तलावात मगर दिवसभर पाण्यात भ्रमंती करीत असल्याने या ठिकाणी पाहणाऱ्यांची गर्दी होत आहे.