शिक्षकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: April 22, 2016 03:28 IST2016-04-22T03:28:59+5:302016-04-22T03:28:59+5:30
जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील शिक्षकांविरूध्द खोट्या तक्रारी करणारे मुख्याध्यापिकेचे पती गुलाब गणपत

शिक्षकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील शिक्षकांविरूध्द खोट्या तक्रारी करणारे मुख्याध्यापिकेचे पती गुलाब गणपत मडावी व शिक्षकांचे पगार थांबविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे पत्र विधान परिषदेचे सदस्य आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील यांनी गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना २० एप्रिल रोजी पाठविले आहे.
या पत्रात आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथील शिक्षकांचे प्रलंबित तीन महिन्यांचे वेतन मिळविण्याकरिता तेथील सर्व शिक्षकांनी २८ सप्टेंबर २०१५ ला आपल्या शालेय परिसरात वेतनाची मागणी केली. कुठल्याही नियमाचे उल्लंघन केलेले नसताना त्या शाळेतील मुख्याध्यापिकेचे पती गुलाब गणपत मडावी यांनी शिक्षकाविरोधात खोट्या तक्रारी करून शिक्षकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. गुलाब मडावी हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक अल्प बचत संचालक या पदावर कार्यरत असताना उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी २० जानेवारी २०१४ रोजी आठ हजार रूपयांची लाच घेताना बडगाईन पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा नोंदविण्यात आला. सद्य:स्थितीत त्यांना सेवेतून निलंबित केलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम भागात प्रतिकुल परिस्थितीत काम करीत असताना मुख्याध्यापिकेच्या निष्क्रीयतेमुळे तीन-तीन महिने शिक्षकांना वेतन मिळत नाही. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीमध्ये घोळ झाल्याचे निदर्शनास आले आहे, ही बाब गंभीर आहे. याबाबत आपण सभागृहात प्रश्न विचारला होता व कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांनी उत्तर दिले होते. शिक्षकांना विनाकारण नाहक त्रास देणाऱ्या गुलाब गणपत मडावी यांच्यावर आणि शिक्षकांचे पगार थांबविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे पत्र विधान परिषदेचे सदस्य आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना २० एप्रिल रोजी पाठविले आहे व या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही यांनी केली आहे.