जिल्हाभरात शिक्षकांच्या आॅनलाईन प्रशिक्षणाला सुरूवात
By Admin | Updated: April 28, 2015 02:11 IST2015-04-28T02:11:41+5:302015-04-28T02:11:41+5:30
जिल्ह्यातील १३ केंद्रावरील ९०० शिक्षकांना आॅनलाईन पध्दतीने पहिल्यांदाच प्रशिक्षण देण्याला सुरूवात झाली.

जिल्हाभरात शिक्षकांच्या आॅनलाईन प्रशिक्षणाला सुरूवात
१३ केंद्रांची निर्मिती : शिक्षकांमध्ये दिसत होता उत्साह व उत्सुकता
गडचिरोली : जिल्ह्यातील १३ केंद्रावरील ९०० शिक्षकांना आॅनलाईन पध्दतीने पहिल्यांदाच प्रशिक्षण देण्याला सुरूवात झाली. आॅनलाईन पध्दतीने प्रशिक्षणाची ही पहिलीच वेळ असल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून येत होते.
वर्षभर चालणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने यावर्षी पहिल्यांदाच आॅनलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. पाचव्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्याने या बदलेल्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी या वर्गाला शिकविणाऱ्या ९०० शिक्षकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १३ प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये गडचिरोली येथे शिवाजी विद्यालय व डायट कॉलेज, चामोर्शी येथे गट साधन केंद्र चामोर्शी व यशोदीप डीएड् कॉलेज, अहेरी येथे गट साधन केंद्र व ग्लोबल विद्यालय आलापल्ली येथे प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. अहेरीतील गट साधन केंद्रात अहेरी तालुक्यातील शिक्षक तर ग्लोबल विद्यालय आलापल्ली येथे एटापल्ली व भामरागड तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, मुलचेरा, सिरोंचा, धानोरा तालुकास्तरावर त्या-त्या तालुक्याच्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. प्रशिक्षणाचा आज पहिला दिवस होता. आॅनलाईन पध्दतीने प्रशिक्षण होण्याची पहिलीच वेळ असल्याने शिक्षकांमध्ये उत्साह व उत्सुकता दिसून येत होती. मात्र काही शिक्षकांची नेमणूक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे सदर शिक्षक मंगळवारपासून प्रशिक्षणाला हजर राहू शकणार नाही. त्यामुळे थोडे निराशेचे वातावरणही दिसून येत होते.
आरमोरी येथील गटसाधन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या आॅनलाईन प्रशिक्षणाला तालुक्यातील ८० शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी डी. जी. नरोटे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
आॅनलाईन प्रशिक्षण चांगले असले तरी जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये नेट कनेक्टिव्हीटीची समस्या आहे. त्यामुळे काही केंद्रावर चित्र दिसताना अडचण निर्माण होत होती. तर काही काळ इंटरनेट सुरू होण्यास अडचण निर्माण झाल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ उडाला.