धानोरातील शिक्षकांचे वेतन थकले
By Admin | Updated: July 25, 2016 01:37 IST2016-07-25T01:37:29+5:302016-07-25T01:37:29+5:30
पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन अजूनपर्यंत काढण्यात आले नाही.

धानोरातील शिक्षकांचे वेतन थकले
धानोरा : पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन अजूनपर्यंत काढण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
जिल्हा परिषदेकडून सर्व पंचायत समित्यांना जून महिन्याचे वेतन १० दिवसांपूर्वीच पाठविण्यात आले आहे. मात्र येथील शिक्षण विभागाने शिक्षकांचे बिल लेखा विभागाला सादर केले नाही. त्यामुळे शिक्षकांना जून महिन्याच्या वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. धानोरा पंचायत समितीमध्ये मागील एक वर्षापासून शिक्षकांचे पगार बिल उशीरा सादर करणे, बिलात वारंवार चुका करणे असे प्रकार सुरू झाले आहेत. परिणामी येथील शिक्षकांचे वेतन इतर पंचायत समितीमधील शिक्षकांच्या तुलनेत नेहमी २० ते २५ दिवस उशीरा होते. त्यामुळे शिक्षकांना नेहमीच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
नव्यानेच पंचायत समितीमध्ये रूजू झालेले बीडीओ सपाटे यांचे समक्ष गट शिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी १४ जुलैपर्यंत शिक्षकांची वेतन बिले सादर करण्याची हमी दिली होती. मात्र यानंतरही परिस्थितीमध्ये कोणताच फरक पडला नाही. वेतन उशीरा मिळणे ही धानोरा पंचायत समितीत नित्याचीच बाब झाली आहे. परिणामी शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. वेळोवेळी कर्मचाऱ्यांकडून त्याच चुका कशा पध्दतीने होतात, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेहमीच वेतन बिल सादर करण्याला उशीर होते. याचा अर्थ येथील कर्मचारी कामचुकार असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी धानोरा तालुक्यातील शिक्षकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)