शिक्षकांची डिजिटल कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 01:43 IST2017-03-01T01:43:59+5:302017-03-01T01:43:59+5:30
जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी भरघोस प्रयत्न करून गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या

शिक्षकांची डिजिटल कार्यशाळा
यू. एन. राऊत यांचे आवाहन : अधिकाधिक शाळा डिजिटल करा
गडचिरोली : जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी भरघोस प्रयत्न करून गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक शाळा डिजिटल कराव्यात, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यू. एन. राऊत यांनी केले.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी येथील डायटमध्ये डिजिटल कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यातील ३१ शाळा मार्च २०१७ पर्यंत १०० टक्के डिजिटल करावयाचे आहे. त्याअनुषंगाने सदर डिजिटल कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्याच्या १०३ केंद्रातील प्रत्येकी १ याप्रमाणे १०३ शिक्षक कार्यशाळेला उपस्थित होते. यावेळी मंचावर डायटचे अधिव्याख्याता डॉ. व्ही. जे. मत्ते, डॉ. नरेश वैद्य, उपशिक्षणाधिकारी (निरंतर) रमेश उचे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत शाळा डिजिटल करण्यासाठी आवश्यक उपकरणांची माहिती व त्याचे उपयोग, अॅन्ड्राईड टीव्ही, एलईडी टीव्ही यांची तांत्रिक माहिती व त्याचा अध्यापनातील वापर, साहित्य निर्मिती तसेच विविध शैक्षणिक अप्लिकेशन याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षकांना माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेत सत्यम चकिनारप, सुधीर गोहणे, राकेश सोनटक्के, अर्चना ढोले, विकास गायधणे या तंत्रस्नेही शिक्षकांनी मार्गदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)