सीईओंच्या भेटीत शिक्षक मद्यधुंद अवस्थेत आढळला
By Admin | Updated: August 11, 2016 01:31 IST2016-08-11T01:31:49+5:302016-08-11T01:31:49+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी बुधवारी कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत गडगडा जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली.

सीईओंच्या भेटीत शिक्षक मद्यधुंद अवस्थेत आढळला
पोलिसात तक्रार : गडगडा जि. प. शाळेतील प्रकार
कुरखेडा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी बुधवारी कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत गडगडा जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. यावेळी या शाळेत कार्यरत सहायक शिक्षक फाल्गुन गिरडकर हे मद्यधुंद अवस्थेत टेबलावर पाय ठेवून कर्तव्यावर असल्याचे दिसून आले.
लागलीच मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी आपल्या सहायकाच्या मदतीने मद्यधुंद अवस्थेतील शिक्षक गिरडकर यांना थेट कुरखेडा पोलीस ठाण्यात आपल्या वाहनात बसवून नेले. सदर घटना बुधवारी दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान घडली. कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत खेडेगाव केंद्रात गडगडा येथे जिल्हा परिषदेची १ ते ४ पर्यंतची प्राथमिक शाळा असून येथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेतील शिक्षक गिरडकर हे मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुरखेडा पोलिसांनी कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात या शिक्षकाची वैद्यकीय तपासणी केली. यात दारू प्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याने या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. गडगडा जि. प. शाळेत सदर प्रकार अधिकाऱ्यांच्या भेटीस उघडकीस आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. सीईओ गोयल कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)