शिक्षकांचे उपोषण सुरूच
By Admin | Updated: May 11, 2017 01:56 IST2017-05-11T01:56:49+5:302017-05-11T01:56:49+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावर्षी राबविण्यात यावी,

शिक्षकांचे उपोषण सुरूच
जि. प. पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट : शिक्षक संघटनांचा पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावर्षी राबविण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. बुधवारीही उपोषण सुरूच होते. दुर्गम भागातील शिक्षकांच्या या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे.
जिल्हा परिषद अधिनस्त प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात कार्यवाही करण्याबाबत तसेच इतर मागण्यांसंदर्भात कार्यवाही करण्यासाठी दुर्गम भागातील शिक्षकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघ, कॉस्ट्राईब कल्याण महासंघ आदी संघटनांच्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे. उपोषण स्थळाला जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, जि. प. सदस्य लता पुंघाटे, प्रा. रमेश बारसागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपशिक्षणाधिकारी मनमोहन चलाख, माजी पं. स. उपसभापती केशव भांडेकर यांनी भेट देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक वर्षांपासून बदली प्रक्रिया रखडल्याने दुर्गम भागातील शिक्षकांवर अन्याय झाला आहे. शासन स्तरावर पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी दिले. साखळी उपोषणाला सिरोंचा तालुक्यातील शिक्षक सहारे, चौधरी, जांभुळे, कोरेटी, शेंडे, एटापल्लीतील वट्टी, वेलादी, कुमरे, ओंडरे आदी बसलेले आहेत.