दुचाकी अपघातात शिक्षक जागीच ठार
By Admin | Updated: December 29, 2014 23:41 IST2014-12-29T23:41:23+5:302014-12-29T23:41:23+5:30
तालुक्यातील मोसम गावावरून आलापल्लीकडे दुचाकीने जात असताना अहेरी-सिरोंचा मार्गावरील नागमंदिराजवळ दुचाकीचा टायर फुटून अपघात झाल्याने दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार,

दुचाकी अपघातात शिक्षक जागीच ठार
पत्नी गंभीर जखमी : टायर फुटल्याने दुचाकीची झाडाला धडक
अहेरी : तालुक्यातील मोसम गावावरून आलापल्लीकडे दुचाकीने जात असताना अहेरी-सिरोंचा मार्गावरील नागमंदिराजवळ दुचाकीचा टायर फुटून अपघात झाल्याने दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार, तर शिक्षकाची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारला दुपारी वाजताच्या सुमारास घडली.
प्रभाकर विठ्ठल कुळमेथे (४५) रा. रेशमीपूर ता. चामोर्शी असे ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांची पत्नी रेखा प्रभाकर कुळमेथे ही या अपघातात गंभीर जखमी झाली. प्राप्त माहितीनुसार शिक्षक प्रभाकर कुळमेथे हे सासुरवाडीला मोसम येथे पत्नीसह दुचाकीने गेले होते. सोमवारला दुपारच्या सुमारास मोसमवरून एमएच ३३-३७३४ या दुचाकीने आलापल्लीकडे परत येत असताना अचानक दुचाकीचा टायर फुटला. त्यामुळे नागमंदिराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दुचाकी आदळली. यात शिक्षक प्रभाकर कुळमेथे हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी रेखा कुळमेथे गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अहेरी ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची नोंद घेतली. या घटनेचा पुढील तपास हडपे, उराडे करीत आहेत. २०१४ वर्षाच्या अखेरीस जिल्हाभरात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)