माडिया भाषेत शिकवले की मुलांचे चेहरे लगेच खुलतात... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 12:07 IST2021-08-19T12:07:09+5:302021-08-19T12:07:31+5:30

Gadchiroli news ज्या दुर्गम भागात पायही ठेवण्यासाठी शिक्षक सहजासहजी धजावत नाहीत, त्या भागात केवळ वर्ग घेण्याची औपचारिकता न करता विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषेत शिकवून शिक्षणाची गोडी लावणाऱ्या या शिक्षकाने तमाम शिक्षकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

Taught in Madiya language that brings smile on children's faces immediately ... | माडिया भाषेत शिकवले की मुलांचे चेहरे लगेच खुलतात... 

माडिया भाषेत शिकवले की मुलांचे चेहरे लगेच खुलतात... 

ठळक मुद्देराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकाचे प्रेरणादायी कार्य

 

मनोज ताजने

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून तब्बल २४३ किलोमीटर अंतरावर, तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या आसरअल्ली या सिरोंचा तालुक्यातील दुर्गम गावात जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिकविणारे शिक्षक खुर्शीद शेख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. ज्या दुर्गम भागात पायही ठेवण्यासाठी शिक्षक सहजासहजी धजावत नाहीत, त्या भागात केवळ वर्ग घेण्याची औपचारिकता न करता विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषेत शिकवून शिक्षणाची गोडी लावणाऱ्या या शिक्षकाने तमाम शिक्षकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. (Education in Madia language in Gadchiroli district )

भौतिक सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या आसरअल्ली या गावात आदिवासींमधील अतिमागास माडिया जमातीचे प्राबल्य आहे. त्यामुळे मुलांना माडिया आणि थोडीफार तेलगू यापलिकडची भाषा माहीत नव्हती. अशा स्थितीत गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गातून शिकवल्या जाणारे मराठीतील शिक्षण सर्वांच्या डोक्यावरून जात होते. ८ वर्षांपूर्वी खुर्शिद शेख यांची तिथे बदली झाली आणि या शाळेत शिक्षणाचा नवीन अध्याय सुरू झाला. आसरअल्लीला येण्यापूर्वी सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर या अतिदुर्गम भागात सहा वर्ष शिकवल्यामुळे शेख यांना माडिया भाषा चांगली अवगत झाली होती. त्याचा फायदा आसरअल्लीच्या शाळेत शिकवण्यासाठी झाला. आज त्या शाळेतील मुले केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर मराठी, हिंदी या भाषाही चांगल्या प्रकारे बोलू लागले आहेत. त्यांच्यातील न्यूनगंड दूर होऊन त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलण्याची ही किमयाच खुर्शीद शेख यांना राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेऊन गेली.

अन् ४७ चे झाले २०० विद्यार्थी

मुलांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगितले तर त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, हे लक्षात घेऊन शेख सरांनी मुलांशी संवाद वाढविला. पालकांची भेट घेऊन त्यांनाही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी प्रवृत्त केले. हळूहळू मुलांना शिक्षणाची गोडी लागली आणि आठ वर्षांपूर्वी असलेली ४७ विद्यार्थ्यांची संख्या आज २०० वर पोहोचली. यासाठी ग्रामपंचायतनेही शाळेत संगणकासारख्या सुविधा पुरवत सर्व सहकार्य केल्याचे खुर्शिद शेख आवर्जुन सांगतात.

Web Title: Taught in Madiya language that brings smile on children's faces immediately ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.