टॅटूमुळे युवकांचे सैन्य दलातील स्वप्न भंगले
By Admin | Updated: January 23, 2016 01:35 IST2016-01-23T01:35:23+5:302016-01-23T01:35:23+5:30
सैन्यदलातर्फे भंडारा येथे गडचिरोली व गोंदिया दोन जिल्ह्यातील युवकांसाठी सैन्य भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली.

टॅटूमुळे युवकांचे सैन्य दलातील स्वप्न भंगले
फॅशन मुळावर : गोंदण असणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद
देसाईगंज : सैन्यदलातर्फे भंडारा येथे गडचिरोली व गोंदिया दोन जिल्ह्यातील युवकांसाठी सैन्य भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यात देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनेक युवक सहभागी झाले. मात्र बहुतांश युवकांच्या शरीरावर गोंदण (टॅटू) असल्याने या तरूणांना सैन्य भरतीच्या प्राथमिक चाचणीतच बाद करण्यात आले. परिणामी टॅटूमुळे जिल्ह्यातील अनेक युवकांचे सैन्यदलात जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
सैन्य भरतीत पात्र होण्यासाठी युवकांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे गोंदण, चिन्ह व टॅटू नसावे, असा नियम आहे. मात्र आधुनिक फॅशनच्या युगात अनेक युवकांनी शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी टॅटू निर्माण केले आहे. यामुळे चपळ व धष्टपूस्ट शरीरयष्टी असतानासुध्दा अनेक युवकांना सैन्य भरतीपासून बाद व्हावे लागले.
टीव्ही सिनेमाचे अनुकरण करताना इतरांपेक्षा काहीतरी वेगळे दिसण्याच्या नादात अनेक युवक स्वत:च्या शरीरावर विविध ठिकाणी टॅटू काढले आहे. शत्रू पक्षात आपली कोणत्याही प्रकारची ओळख निर्माण होऊन यासाठी शरीरावर चिन्ह, टॅटू, गोंदण नसावे, असा लष्करभरतीचा नियम आहे. शरीरावर टॅटू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनामुळे टॅटू नेहमीकरिता शरीरावर कायम राहते.
व्यायाम शाळेत जाऊन अनेक युवकांनी धष्टपूष्ट शरीरयष्टी कमावली व भंडारा येथील सैन्य भरती प्रक्रियेत सहभागी झाले. मात्र जवळपास १२ युवकांच्या शरीरावर टॅटू असल्यामुळे त्यांना भरतीच्या प्राथमिक चाचणीतच बाद करण्यात आले. त्यामुळे पुढील चाचणीपूर्वीच या युवकांना परतीचा प्रवास करून गावाला पोहोचावे लागले. (वार्ताहर)
नियमाबाबत अनभिज्ञता; संधी गमावली
भंडारा येथे ६ ते १६ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सैन्य भरतीसाठी आपण गेलो. मात्र आपल्या शरीरावर टॅटू असल्यामुळे प्राथमिक चाचणीतच भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले. सैन्य भरतीच्या या नियमाची आपल्या माहिती नव्हती. फॅशनच्या प्रवाहात वाहत गेल्यामुळे आपल्याला ही सैन्य दलातील नोकरीची संधी गमवावी लागली, असे एका युवकाने अश्रू ढाळत सांगितले.