Taste of mangoes will be expensive this year | गावठी आंब्याची लज्जत यावर्षी महागणार

गावठी आंब्याची लज्जत यावर्षी महागणार

ठळक मुद्देगारपिटीचा फटका : वातावरणातील बदलामुळे मोहोर झडला, जुन्या आमराया होताहेत नष्ट

विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : फळांचा राजा म्हणून आंब्याच्या फळाची संपूर्ण भारतात ओळख आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी आंब्याच्या झाडांना फार कमी मोहर आला. १५ दिवसांपूर्वी झालेल्या गारपीठमुळे असलेला मोहरही झडून गेला. त्यामुळे आता आंब्याच्या झाडाला फारच कमी कैऱ्या लागल्या आहेत. काही झाडांना तर एकही कैरी दिसत नाही. केवळ हिरवेगार आंब्याचे झाड दिसून येते. आंब्याचे उत्पादन घटणार असल्याने आंब्याचे भाव गगणाला भिडतील. त्यामुळे खवय्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात संकरित आंब्यांच्या फळबागा फार कमी प्रमाणात आहेत. गावठी आंब्याची झाडे आहेत. तसेच काही गावांमध्ये आमराई आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होताच आबालवृद्धांचे लक्ष आमराईकडे जाते. जानेवारी महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहर येते. मोहरामुळे हिरवे आंब्याचे झाड पिवळे झुंज दिसायला लागतात. मात्र यावर्षी वातावरणात झालेल्या बदलाचा मोठा फटका आंबा व मोहाला बसला. यावर्षी पावसाळ्यात सतत दोन महिने पाऊस पडला. त्यानंतर हिवाळ्यातही अधूनमधून ढगाळ वातावरण राहत असल्याने पाहिजे तशी थंडी पडली नाही. ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या झाडाला मोहर आले नाही. त्यानंतर मार्च महिन्यात दोन ते तीनवेळा गारपीट झाली. गारपीटचा मोठा फटका मोहराला बसला. आंब्याच्या झाडावरील संपूर्ण मोहोर झडला. त्यामुळे आता झाडाला कैºया नाहीत.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे होती. मात्र शेतीसाठी या झाडांची कत्तल झाली. मात्र काही गावांमध्ये आमराई शिल्लक आहे. नवीन झाडांची लागवड होत असल्याने आमराई नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावठी आंब्याची चव पुढच्या पिढीला चाखायला मिळणे जवळपास कठीण आहे. परिणामी शहरातील बरेचसे लोक आपल्या अंगणात आंब्याचे रोपटे लावतात.

आंब्याविना झाली गुढीपाडव्याची पूजा
गुढीपाडव्याच्या सणाला आंब्याची पूजा करून गुढी उभारली जाते. तसेच या दिवशी विविध कडधान्यांचा उसळ व आंब्याचा पणा किंवा चटणी करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. वयोवृद्ध नागरिक गुढीपाडव्याचा सण झाल्याशिवाय आंबा खात नाही. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या सणाला आंब्याचे महत्त्व आहे. मात्र यावर्षी कच्चे आंबे बाजारपेठेत आले नाही. त्यामुळे आंब्याच्या फळाविनाच गुढीपाडव्याची पूजा करावी लागली.
गुढी पाडव्याच्या दिवशी गडचिरोली शहरात काही मोजके विक्रेते गावठी आंब्याची विक्री करीत होते. मात्र आंब्याचा भाव वधारलेला होता. ४० रुपये पाव या दराने गांधी चौकात आंबे विकली जात होती. शेतकऱ्यांकडूनच आंब्याचे भाव वाढून आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: Taste of mangoes will be expensive this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.