रणरागिनी! बिबट्याच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने वार करत ताराबाईने केली पतीची सुटका
By गेापाल लाजुरकर | Updated: December 30, 2024 20:18 IST2024-12-30T20:18:26+5:302024-12-30T20:18:40+5:30
नागरवाही जंगलातील थरार : चारपैकी दाेघेजण गंभीर जखमी.

रणरागिनी! बिबट्याच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने वार करत ताराबाईने केली पतीची सुटका
गाेपाल लाजूरकर, गडचिराेली
गडचिराेली : सरपण गाेळा करून बैलबंडीत भरत असतानाच झुडपातून अचानक बिबट्याने चार जणांवर एकापाठाेपाठ हल्ला चढविला. यात एक जाेडपे हाेते. आपल्या पतीवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसताच महिलेने बिबट्याच्या डाेक्यावर कुऱ्हाडीच्या मुंदे(मागील बाजू)ने वार करीत पतीची सुटका केली. हा थरार आरमाेरी तालुक्याच्या नागरवाही जंगलात साेमवार, ३० डिसेंबर राेजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला. बिबट्याच्या हल्ल्यात दाेघेजण गंभीर जखमी तर दाेघे किरकाेळ जखमी झाले.
गोवर्धन यादव कुमरे (६३), दीक्षांत तेजराव कुमरे (२२) हे दाेघे गंभीर जखमी झाले, तर ताराबाई कुमरे (५०), तेजराव मोडूजी कुमरे (५२) हे किरकाेळ जखमी झाले. हे चारही जण नागरवाही येथील रहिवासी आहेत. यात दाेघे पिता-पुत्राचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नागरवाही येथील कक्ष क्र. ३०८ मधील जंगलात ३० डिसेंबर राेजी सकाळी चारजण सरपण गाेळा करण्यासाठी गेले हाेते. सरपण गाेळा करून दुपारी १ वाजेच्या सुमारास बैलबंडीमध्ये भरत असतानाच झुडपातून बिबट्याने चारही जणांवर एकापाठाेपाठ प्राणघातक हल्ला केला. सर्वानी मिळून हिमतीने बिबट्याचा सामना केला. दरम्यान, बिबट्याने गाेवर्धन कुमरे यांच्यावर हल्ला केला असता त्यांची पत्नी ताराबाई यांनी मोठ्या हिमतीने बिबट्याच्या डाेक्यावर कुऱ्हाडीच्या मागील बाजूने वार केला. ह्या जबरदस्त वारामुळे व चारही जणांच्या ओरडण्यामुळे बिबट जंगलात पळून गेला. घटनेची माहिती मिळताच देलनवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहेर व कर्मचाऱ्यांनी जखमींना सुरूवातीला देलनवाडी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारार्थ भरती केले. त्यानंतर आरमाेरी उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
देलनवाडीच्या जंगलात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी जंगलात एकटे-दुकटे जाऊ नये. वन्यप्राण्यांपासून स्वत:ला जितके दूर ठेवता येईल तेवढे दूर राहावे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना शासन नियमानुसार भरपाई दिली जाईल.
- संजय मेहेर, वनपरिक्षेत्र अधिकारी, देलनवाडी