सिरोंचात तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया बारगळली

By Admin | Updated: March 30, 2016 01:41 IST2016-03-30T01:41:01+5:302016-03-30T01:41:01+5:30

सन २०१६ च्या हंगामासाठी स्थानिक क्रीडा संकुलाच्या सभागृहात मंगळवारी दुपारी ११ वाजता होऊ घातलेली लिलाव प्रक्रिया बारगळली.

Tandupta auction process in Sironchat | सिरोंचात तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया बारगळली

सिरोंचात तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया बारगळली

ग्रामपंचायतींचा आक्षेप : वन व्यवस्थापन समितीचीही हरकत
सिरोंचा : सन २०१६ च्या हंगामासाठी स्थानिक क्रीडा संकुलाच्या सभागृहात मंगळवारी दुपारी ११ वाजता होऊ घातलेली लिलाव प्रक्रिया बारगळली. सदर प्रस्तावित लिलावाची निविदा पूर्व सूचना महाराष्ट्रासह सीमावर्तीय आंध्र, तेलंगण राज्यांना प्रसारीत करण्यात आली. त्यानुसार हैदराबाद, मंचेरियाल, चन्नूर, नागपूर, बल्लारशहा येथील इच्छुक कंत्राटदार येथे आले. सिरोंचा वन विभागाचे उपविभागीय वनाधिकारी एल. एम. बेलेकर यांनी लिलावापूर्वी प्रास्ताविक सुरू करताच तेथे उपस्थित असलेल्या जमावाने आक्षेप घेतला.
लिलाव प्रक्रिया तालुका मुख्यालयी न घेता त्या-त्या ग्रामपंचायतीच्या मुख्यालयात घेण्यात यावी व कंत्राटदारांना ग्रामपंचायतस्तरावर बोलविण्यात यावे जेणे करून संबंधित मजूर वर्गांना संबंधितांशी ओळख होऊन उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे सोयीचे होईल. ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी घेतलेल्या या आक्षेपाला गावपातळीवरील वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही अनुमोदन दिले. त्यामुळे लिलावाच्या ठिकाणी काही काळ सौम्य तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून समज दिल्याने शांतता भंग झाला नाही. स्थगित झालेली लिलाव प्रक्रिया कधी पार पडेल. याबाबत अधिकृतरित्या काही कळू शकले नाही. अनेकांचा या एकत्रित लिलाव प्रक्रियेला विरोध होता.
गेल्या वर्षीच्या हंगामात कोप्पेला, झिंगानूर, आसरअल्ली भागात तेंदू मजुरांना दिलेल्या रक्कमेत कंत्राटदारांनी दुजाभाव केल्याची तक्रार होती. कोप्पेला परिसर संवेदनशील असल्याचे सांगून तेथील मजुरांना जास्त रक्कम देण्यात आली. तर आसरअल्ली विभाग नक्षलीदृष्ट्या सौम्य असल्याने कमी रक्कम अदा करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tandupta auction process in Sironchat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.