विकासासाठी दोन पाऊल पुढे या

By Admin | Updated: July 29, 2016 01:16 IST2016-07-29T01:16:05+5:302016-07-29T01:16:05+5:30

केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्वत:ची अविकसित ही ओळख पुसून काढण्यासाठी दुर्गम भागातील ...

Take two steps ahead for development | विकासासाठी दोन पाऊल पुढे या

विकासासाठी दोन पाऊल पुढे या

पोलीस अधीक्षकांचे आवाहन : गडचिरोलीत जनजागरण मेळावा
गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्वत:ची अविकसित ही ओळख पुसून काढण्यासाठी दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांनी दोन पाऊल पुढे चालावे, प्रशासनाला सहकार्य करून किंवा मदत घेऊन आपला विकास साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनीत २७ ते ३० जुलैदरम्यान जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जुलै रोजी नागरिकांना शेती उपयोगी साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादर, शिकाऊ उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, ठाणेदार विजय पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले की, हिंसक कारवाया करून स्वत:ची दहशत निर्माण करणे व विकासापासून आदिवासींना वंचित ठेवणे हेच काम आजपर्यंत नक्षलवाद्यांनी केले आहे. नक्षलवादी चळवळीतील फोलपणा तेथेच काम करणाऱ्या सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर १५ ते २० वर्ष काम करणाऱ्या सदस्यांनी चळवळ सोडली आहे. गावातील निरक्षर नागरिकांना योजनांची माहिती द्या, शासनाच्या योजना गावात प्रभाविपणे राबवा व स्वत:च्या गावाचा विकास करून आदर्श गाव निर्माण करा, ज्या प्रमाणे हिवरेबाजार गावासोबत पोपटराव पवार व राळेगणसिद्धी गावासोबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव जोडले जाते. त्याचप्रमाणे तुमचेही नाव तुमच्या गावासोबत जोडले जाईल, यासाठी गावाचा विकास करा, असे आवाहन केले.
तीन दिवसीय मेळाव्यात नागरिकांची आरोग्य तपासणी, नागरिकांना साहित्य वितरण, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. पहिल्या दिवशी गावातील समस्या जाणून घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, संचालन पोलीस उपनिरीक्षक सतीश सिरसाट तर आभार पीएसआय मल्हार थोरात यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

 

Web Title: Take two steps ahead for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.