कमलापुरातील हत्तींना घेऊन जा हो... प्रशासनाला निवेदन, गावकऱ्यांचा ‘यु टर्न’झाला चर्चेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 11:20 AM2022-06-25T11:20:16+5:302022-06-25T11:22:47+5:30

गावकऱ्यांना अशी भूमिका घेण्यासाठी भाग पाडले जात असून हत्ती गुजरातकडे नेण्यासाठीच हा डाव रचला असल्याची भावना वन्यजीवप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.

take the elephants from Kamalapur; villagers demand for relocation of elephants in the elephant camp | कमलापुरातील हत्तींना घेऊन जा हो... प्रशासनाला निवेदन, गावकऱ्यांचा ‘यु टर्न’झाला चर्चेचा विषय

कमलापुरातील हत्तींना घेऊन जा हो... प्रशासनाला निवेदन, गावकऱ्यांचा ‘यु टर्न’झाला चर्चेचा विषय

googlenewsNext

गुड्डीगुड्डम (गडचिरोली) :अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या आसा गावच्या हद्दीतील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या सर्व हत्तींना स्थलांतरित करावे, अशी मागणी कमलापूर, दामरंचा, मंडरा, कुरुमपल्ली या ग्रामपंचायतींमधील काही नागरिकांनी केली. त्याबाबतचे निवेदन अहेरी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. आतापर्यंत हत्ती आमची शान आहे, त्यांना जाऊ देणार नाही, असे म्हणणाऱ्या गावकऱ्यांनी अचानक असा ‘यु टर्न’ घेतल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

निवेदनात म्हटल्यानुसार, कमलापूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या मौजा आसा गावच्या हद्दीमधील हत्ती कॅम्पमुळे आसा, नैनगुंडम, नैनर, मदगू, पालेकसा, कोडसेपल्ली, मंडरा, मोदुमडगू, दामरंचा, वेलगुर, कोयागुडाम, भंगारामपेठा, रुमालकसा, तोंडेर, सिटवेली, चिंतारेव, कुर्ता इत्यादी १७ गावांतील लोकांना रस्त्याने येणे-जाणे करताना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांचे शेतपिकांचेही नुकसान होत असते. अनेक वेळा हत्तींमुळे वाहनांचीही तोडफोड झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे कमलापूर आणि कुरुमपल्ली या दोन ग्रामपंचायतींनी सर्व हत्तींना स्थलांतरित करण्याबद्दल ठरावसुद्धा पारित केला आहे. या सर्व समस्यांचा विचार करून हत्तींना यापूर्वी शासनाने ठरविलेल्या ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणीही केली आहे.

अचानक कसे झाले हत्ती उपद्रवी?

अनेक वर्षांपासून कमलापूर परिसरातील जंगलात वावरणाऱ्या या हत्तींनी कोणाची वाट अडविल्याच्या, गावात शिरून वाहनांचे किंवा शेतातील पिकांचे नुकसान केल्याच्या घटनांची कधी वाच्यता झाली नाही. वनविभागाकडेही त्याची नोंद नाही. असे असताना अचानक हे पाळीव हत्ती उपद्रवी झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आश्चर्यात टाकणारे आहे. गावकऱ्यांना अशी भूमिका घेण्यासाठी भाग पाडले जात असून हत्ती गुजरातकडे नेण्यासाठीच हा डाव रचला असल्याची भावना वन्यजीवप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.

Web Title: take the elephants from Kamalapur; villagers demand for relocation of elephants in the elephant camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.