बाहेरगावी जाताना विशेष खबरदारी घ्या
By Admin | Updated: November 18, 2015 01:37 IST2015-11-18T01:37:33+5:302015-11-18T01:37:33+5:30
दिवाळीची सुटी असल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेकांनी दिवाळीच्या सुटींमध्ये पर्यटनाचे, बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत; ...

बाहेरगावी जाताना विशेष खबरदारी घ्या
खबरदारी घेतल्यास चोरी टाळणे शक्य : दिवाळी व उन्हाळ्यामध्ये वाढते घरफोड्यांचे प्रमाण
गडचिरोली : दिवाळीची सुटी असल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेकांनी दिवाळीच्या सुटींमध्ये पर्यटनाचे, बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत; परंतु बाहेरगावी जाताना, नागरिकांनी खबरदारीही घेणे गरजेचे आहे. बंद घर पाहून घरफोडी आणि चोरी करण्यासाठी चोरटे सक्रिय झाले आहेत. बाहेरगावी जाताना सूचना देण्यासोबतच, घराच्या सुरक्षिततेची उपाययोजनाही करून जाण्याचे आवाहन पोलीस नेहमीच करतात; परंतु पोलिसांच्या सूचनांकडे, उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्या जाते.
सध्या शाळा, महाविद्यालयांना सुटी आहे. शासकीय सुटीही लागोपाठ आल्याने विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, प्राध्यापक व नोकरदारवर्गाने पर्यटनस्थळी किंवा बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. अशावेळी कॉलनी आणि परिसरातील बंद घरांची पाहणी करून चोरट्यांकडून रात्रीच्यावेळी घरफोडी व चोरीचे प्रयत्न होत आहेत.
आरमोरी येथे एकाच दिवशी आठ घरफोड्या झाल्या व त्यापूर्वीही आरमोरी येथे चोरी झाली आहे. त्याचबरोबर गडचिरोलीसह इतरही शहरांमध्ये लहान- मोठ्या चोऱ्या घडत आहेत. बाहेरगावी जाताना घर सुरक्षित राहिल याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. घराची चिंता नसल्यास पर्यटनस्थळाचाही आनंद लुटता येईल. यासाठी काही तांत्रिकबाबी नागरिकांनी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.