शापोआ कर्मचाऱ्यांना कामावर घ्या
By Admin | Updated: December 21, 2015 01:38 IST2015-12-21T01:38:03+5:302015-12-21T01:38:03+5:30
काही ठिकाणी गावातील राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून जुन्या कर्मचाऱ्यांना सरसकट कामावरून कमी केले.

शापोआ कर्मचाऱ्यांना कामावर घ्या
अहेरी पं. स. वर धडक : चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी केल्याचा आरोप
अहेरी : काही ठिकाणी गावातील राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून जुन्या कर्मचाऱ्यांना सरसकट कामावरून कमी केले. त्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे या मागणीसाठी तालुक्यातील शापोआ कर्मचाऱ्यांच्या वतीने शनिवारी अहेरी पंचायत समितीवर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
मागील १५ ते २० वर्षांपासून शालेय पोषण आहार कर्मचारी ग्रामीण भागात जि. प. शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये अत्यल्प मानधनावर शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम कर्मचारी करीत आहेत. सुरूवातीला कर्मचाऱ्यांना १० ते १५ रूपये मजुरी दिली जायची तरीसुद्धा कर्मचारी काम करत राहिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ व्हावी, याकरिता आयटकच्या नेतृत्त्वात अनेकदा आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर सरकारने शापोआ कर्मचाऱ्यांना २०११ पासून विद्यार्थी संख्येनुसार मानधन देण्याचे मान्य केले. परंतु अहेरी तालुक्यातील जि. प. शाळा पुसूकपल्ली तसेच राजे धर्मराव हायस्कूल आलापल्ली येथील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे या मागणीसाठी पं. स. वर जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी गणेश चापले, शकुंतला गुरनुले, किशोर पेंदाम, किशोर सुनतकर उपस्थित होते.
पं. स. चे शापोआ अधीक्षक पाचांगे व संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १५ हजार रूपये प्रतिमाह वेतन देणे, आॅक्टोबरपासूनचे थकीत मानधन व इंधन बिल बँक खात्यात जमा करणे, प्रत्येक शाळांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करून त्याचा खर्च सरकारने भरावा, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, वर्षातून दोन गणवेश द्यावे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. कमी केलेल्या स्वयंपाकी महिलांना पूर्ववत कामावर घेण्याचे आश्वासन तसेच नोव्हेंबरपासूनचे वेतन खात्यात जमा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी मानधन वाढीसाठी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आमदार, खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचेही ठरविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)