भामरागडला घ्या मंत्रिमंडळाची बैठक
By Admin | Updated: February 20, 2015 01:09 IST2015-02-20T01:09:02+5:302015-02-20T01:09:02+5:30
गडचिरोली : २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५२ पोलीस जवान शहीद झाले होते. जिल्ह्यातील वातावरणही पोलीस दलासाठी अनुकूल नव्हते.

भामरागडला घ्या मंत्रिमंडळाची बैठक
लोकमत विशेष
गडचिरोली : २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५२ पोलीस जवान शहीद झाले होते. जिल्ह्यातील वातावरणही पोलीस दलासाठी अनुकूल नव्हते. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर राज्याचे गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील उत्तर देण्यासाठी सज्ज होते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले बल्लारपूरचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत सहभागी होताना आर. आर. पाटील यांना गडचिरोलीचे पालकत्व तुम्ही स्वीकारले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली.
आबांनी चर्चेच्यादरम्यानच हे आव्हान आपण स्वीकारणार असल्याचे सांगून गडचिरोलीचे पालकत्व तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून मागून घेतले. चर्चा संपल्यावर अनेकांना याचे आश्चर्य वाटले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आर. आर. पाटील यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देणार होते. परंतु आबांनी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासाठी एक आव्हान म्हणून आग्रही भूमिका घेतली व जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. त्यानंतरही विद्यमान वित्त व नियोजन तसेच वनमंत्री मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र मंत्रीमंडळाची एक बैठक भामरागडला झाली पाहिजे, या जिल्ह्याच्या समस्यांबाबत तत्कालीन आघाडी सरकार गंभीर नाही, असे म्हटले होते. एकटे आबा जिल्हा विकासासाठी धडपडत आहे. परंतु बाकी मंत्रीमंडळ गंभीर नाही, असे मुनगंटीवारांचे म्हणणे होते. आबांच्या प्रत्येक निर्णयाला त्यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार म्हणून प्रचंड पाठींबा दर्शविला होता.
जिल्हा विकास प्राधिकरण निर्मितीचा मुद्दा असो, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती असो, हे सारे मुद्दे त्यांनी लावून धरले होते. अनेकदा मुनगंटीवारांनी आपल्या स्वपक्षातील लोकांना आबांविरूध्द जिल्हा विकासाच्या संदर्भात जाहीररित्या प्रतिक्रिया नोंदवू नका, असेही सांगितले होते. एकूणच आबा व मुनगंटीवारांचा ऋणानुबंध त्यावेळीही कायम होता. आर. आर. पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनाच जिल्ह्यात आणले नाही तर तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान महसूल मंत्री एकनाथ खडसे व विद्यमान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही हेलिकॉप्टरने अहेरी, सिरोंचाच्या दौऱ्यावर नेले होते. या भागातील समस्या त्यांनाही लोकांकडून ऐकविल्या होत्या.
पूर्ण दिवस एकनाथ खडसे व रावते आर. आर. पाटील यांच्यासोबत जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज आबा हयात नाही. राज्यांत सत्तांतरण झाले आहे. नव्या सरकारने आपली एक मंत्रीमंडळाची बैठक भामरागड येथे घेऊन आर. आर. पाटील यांना खरी आदरांजली द्यावी, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. यानिमित्ताने मंत्रीही भामरागडला येतील. या भागाची ओळखही त्यांना होईल. (जिल्हा प्रतिनिधी)