योजनांचा लाभ घेऊन समाज, कुटुंबाचा विकास साधा
By Admin | Updated: November 29, 2014 23:21 IST2014-11-29T23:21:55+5:302014-11-29T23:21:55+5:30
शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबविल्या जातात. मात्र अनेक नागरिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहतात.

योजनांचा लाभ घेऊन समाज, कुटुंबाचा विकास साधा
घोट : शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबविल्या जातात. मात्र अनेक नागरिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहतात. परिणामी कुटुंबाचा व समाजाचा विकास खुंटते. कुटुंबाच्या विकासासाठी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन चामोर्शी पं. स. चे संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांनी केले.
बेलगट्टा येथे पोलीस विभागाच्यावतीने आयोजित जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच विठाबाई चौधरी, महेंद्र आलाम, पोलीस पाटील चमरू मडावी, बेलगट्टा चकचे पोलीस पाटील ऋषी मडावी, घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार, चामोर्शीचे वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, प्रभारी अधिकारी एम. जी. कवडे, पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. खतेले, पी. पी. इंगळे, एन. व्ही. पोळ, एन. बी. कदम, एन. यू. नाईक, ग्रामसेवक रोडे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विविध विभागाच्यावतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान पोलीस विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या रांगोळी व व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक पटणे तर आभार पीएसआय इंगळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी व नागरिकांनी सकहार्य केले. (वार्ताहर)