वसाकेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:44+5:302016-04-03T03:50:44+5:30
ग्रामसेवक सुधीर वसाके यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामसेवक ...

वसाकेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा
कोरची ग्रामसेवकांचे धरणे : मृतक ग्रामसेवकाची पत्नी आंदोलनात सहभागी
कोरची : ग्रामसेवक सुधीर वसाके यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामसेवक युनियन तालुका शाखा कोरचीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुधीर वसाके यांचे मासीक वेतन, जीपीएफ प्रकरण निकाली न काढता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा मानसिक व आर्थिक छळ केला आहे. ही बाब वसाके यांनी मृत्यूपूर्व बयानात नमूद केली आहे. त्यांच्या मृत्यूशी संबंध असलेल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डी. एम. वैरागडे व विस्तार अधिकारी अशोक ठाकरे यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, सहसचिव पुरूषोत्तम बनपुरकर, रणजित राठोड, इरशाद पठाण यांच्यासह कोरची तालुक्यातील ग्रामसेवक तसेच सुधीर वसाके यांच्या पत्नी सुषमा सुधीर वसाके या सुध्दा सहभागी झाल्या होत्या. गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)