सरपंच व सचिवावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 02:01 IST2016-09-18T02:01:32+5:302016-09-18T02:01:32+5:30
तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी स्वत:च्याच मर्जीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे.

सरपंच व सचिवावर कारवाई करा
बीडीओंना निवेदन : नारायणपूर व अमरावती गावातील नारिकांची मागणी
सिरोंचा : तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी स्वत:च्याच मर्जीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. परिणामी येथील सरपंच व सचिव यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नारायणपूर व अमरावती येथील नागरिकांनी सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
एप्रिल २०१५ मध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळी सरपंचपदावर भुदेवी दुर्गया गावडे यांची निवड करण्यात आली. सचिवपदावर एम. एल. मेश्राम हे मागील एक वर्षांपासून कार्यरत आहेत. गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी सरपंच व सचिव दोघेही आपल्या मनमर्जीने खर्च करीत आहेत. कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर झाला, किती निधी खर्च झाला व किती शिल्लक आहे, याचा हिशेब आमसभेत ठेवत नाही. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाकरिता सचिव अनुपस्थितीत होते. १५ आॅगस्ट रोजीची तहकूब झालेली आमसभा १६ सप्टेंबर रोजी बोलविण्यात आली होती. जवळपास २०० नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान घरकूल आवास योजनेवर नागरिक प्रश्न विचारणार असल्याचे बघून सचिवांनी ग्रामसभा तहकूब केली व निघून गेले. १५ आॅगस्टच्या आमसभेमध्ये ठेवण्यात आलेली विषय सूची न ठेवता फक्त घरकूल हा एकच विषय ठेवण्यात आला होता. नियमाप्रमाणे १५ आॅगस्टच्या आमसभेमध्ये जेवढे विषय ठेवण्यात आले होते, तेवढेच विषय त्यानंतरच्या ग्रामसभेमध्ये ठेवणे गरजेचे होते.
सरपंच व सचिव यांच्या मनमानी कारभारामुळे नारायणपूर तसेच अमरावती गावाचा विकास रखडला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सिरोंचाचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी नागराजू नानय्या इंगीली, अशोक येलय्या इंगीली, गट्टू शिवनारायण चम्माकारी, रमेश येलय्या दाया, अशोक समय्या आरे, ओदयालू भिमय्या नसकुरी आदी उपस्थित होते.