अफरातफर करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा
By Admin | Updated: December 2, 2014 23:06 IST2014-12-02T23:06:56+5:302014-12-02T23:06:56+5:30
ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवड व अन्य कामांमध्ये सरपंचांची बनावट स्वाक्षरी घेऊन आर्थिक अफरातफर करणारे ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी,

अफरातफर करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा
उपोषणाचा इशारा : जि. प. सीईओंकडे निवेदन
अहेरी : ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवड व अन्य कामांमध्ये सरपंचांची बनावट स्वाक्षरी घेऊन आर्थिक अफरातफर करणारे ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजाराम ग्रामपंचायतीचे सदस्य व आलापल्लीच्या ग्रा. पं. सदस्यांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात अब्दुल रहेमान, राजाराम ग्रा. पं. चे सदस्य ज्योती जुमनाके, भाष्कर तलांडे व आलापल्लीचे ग्रा. पं. सदस्य विजय कुसनाके यांनी म्हटले आहे की, ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी हे अहेरी पंचायत समितीतील राजाराम व खांदला ग्रामपंचायतीला ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची किष्टापूर वेल येथे बदली करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीचा प्रभार दुसऱ्या ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आला आहे. असे असतांनाही राजाराम ग्रा. पं. चे ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी यांनी २३ आॅक्टोबर २०१३ रोजी २ लाख ६० हजार रूपयांची रक्कम बँकेतून काढली. धनादेशावर सरपंचाची बनावट स्वाक्षरी करून सदर रक्कम हडप केली. सोलर दिवे खरेदीचे ४ लाख २ हजार ३९८ रूपयांची बोगस देयके तयार केली आहे. विविध बांधकामाबाबत मूल्यांकनापेक्षा जादा रक्कम खर्च करून लाखो रूपयांची अफरातफर ग्रामसेवक वेलादी यांनी केली असल्याचा आरोप ग्रा. पं. सदस्यांनी निवेदनात केला आहे. यासंदर्भात अहेरी पं. स. च्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीकरिता जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अहवाल सादर केला आहे. मात्र याबाबत ग्रामसेवकावर कोणतीच कारवाई झाली नाही.
ग्रामसेवक वेलादी यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कार्यवाही करावी, अन्यथा विद्यार्थी संघटनेच्यावतीने ८ डिसेंबरपासून अहेरी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी अब्दुल रहेमान यांनी दिला आहे.
(तालुका प्रतिनिधी)