औषधांचे बिल न देणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST2021-05-09T04:38:03+5:302021-05-09T04:38:03+5:30
देसाईगंज : गडचिरोली शहरातील बहुतांश औषध विक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाहीत. १० गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रिपवर किंमत लिहून राहते. ...

औषधांचे बिल न देणाऱ्यांवर कारवाई करा
देसाईगंज : गडचिरोली शहरातील बहुतांश औषध विक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाहीत. १० गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रिपवर किंमत लिहून राहते. मात्र, ग्राहकाने पाच ते सहा गोळ्या खरेदी केल्यास त्यासाठी किती किंमत आकारली जाते, याचा थांगपत्ता लागत नाही.
वन डेपोत जळाऊ लाकूड उपलब्ध करा
गडचिरोली : वन विभागाच्या डेपोमार्फत नागरिकांना जळाऊ लाकूड कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाते. मात्र, नागरिकांना पुरेशा प्रमाणात जळाऊ लाकूड उपलब्ध करून दिले जात नाही. बऱ्याच वेळा लाकडाचे बीट कुजलेले असतात. त्यामुळे ते चांगले जळतसुद्धा नाही.
अपघात वाढले
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर भेंडाळाच्या बसस्थानकावर गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी वाहने भरधाव वेगाने जातात. मात्र, या ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. माेठे गाव असतानाही बसस्थानक नसल्याने या ठिकाणी अपघात वाढले आहेत.
कुटुंब नियोजनाची गरज
मुलचेरा : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. पुरुषांमध्ये नसबंदीबाबत गैरसमज असल्याचे दिसते.
वाकडी-बोरी मार्गावर खड्डे
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, या रस्त्याची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही संबंधित प्रशासकीय यंत्रणेने दुरुस्तीच्या कामाकडे कानाडोळा केला आहे.
तलावाचे सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे तलावाचे सौंदर्यीकरण करावे.
कोटगूल येथे आयटीआयची मागणी
कोरची : कोटगूल येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर करून या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आयटीआय स्थापन केल्याने बेरोजगारीची समस्या दूर होईल. त्यामुळे आयटीआयची निर्मिती आवश्यक आहे.
आरोग्यसेविकांची पदे रिक्त
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३६ आरोग्य पथके व ३७६ उपकेंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करते. मात्र, जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दर हजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे.
आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ कि.मी.चा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
नूतनीकरणाची प्रतीक्षा
अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा-ताडगावपर्यंतच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच रस्ता उखडला असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. नूतनीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कोंडवाडा जीर्णावस्थेत
अहेरी : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्यांचे छप्पर पूर्णपणे उडून गेले आहे. त्यामुळे या काेंडवाड्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.
विश्रामगृह प्रलंबितच
कोरची : येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे.
बांधकामामुळे अडथळा
गडचिरोली : शहरात विविध भागांत घरांचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळया तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळया आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र, याकडे न.प.चे दुर्लक्ष आहे. साहित्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातही वाढले आहेत.
आष्टीत जनावरे माेकाट
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आहे.