सचिव,सरपंचावर कारवाई करा
By Admin | Updated: July 2, 2014 23:20 IST2014-07-02T23:20:05+5:302014-07-02T23:20:05+5:30
ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती फंडातून पर्यावरण संतुलीत ग्रामसमृध्दी योजनेत मोठा गैरव्यवहार करण्यात आला आहे. पाणी पुरवठा निधीची चौकशी करून कुंभीटोला ग्रा. पं. तील सरपंच

सचिव,सरपंचावर कारवाई करा
ग्रामसमृध्दी योजनेत गैरव्यवहार : निधीच्या चौकशीची सदस्यांची मागणी
कुरखेडा : ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती फंडातून पर्यावरण संतुलीत ग्रामसमृध्दी योजनेत मोठा गैरव्यवहार करण्यात आला आहे. पाणी पुरवठा निधीची चौकशी करून कुंभीटोला ग्रा. पं. तील सरपंच व सचिव यांना जबाबदार ठरविण्यात आले होते. मात्र संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा निधीच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुंभीटोला येथील उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
कुंभीटोला येथे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता निधीतून ९ मे ते १३ सप्टेंबर २०१३ या कालावधीत ४३ हजार ५०९ रूपयांची उचल संबंधितांकडून करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ४५० रूपये बल्ब लावण्याकरिता खर्ची घालण्यात आले, अशी तक्रार कुंभीटोला येथील पदाधिकारी व गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केली होती. या संदर्भात पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन दस्ताऐवजाची तपासणी व संबंधितांचे बयाण नोंदविले होते व प्रत्यक्षात कोणताच खर्च न होता पैशाची उचल करण्यात आली आहे, असा अभिप्राय १९ डिसेंबर २०१३ ला सादर केला होता. यानंतर संबंधितांच्या विरोधात ठोस कार्यवाही करीत फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र संबंधितांविरोधात कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. पर्यावरण संतुलीत ग्रामसमृध्दी योजनेतून १ लाख ४ हजार व १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १९ हजार ५०० रूपये सचिव व सरपंच यांनी परस्पर संगनमताने ग्रा. पं. स्तरावर कुठलेही काम न करता उचलले या संदर्भातील तक्रार संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे ५ मे २०१४ ला दाखल केली.
मात्र संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी निधी संदर्भातील गैर व्यवहारप्रकरणी साधी चौकशीही केली नाही, असा आरोप उपसरपंच लता सहारे, ग्रामपंचायत सदस्य सोनाबाई मडावी, उर्मिला भांडारकर, योगीनाथ जनबंधू, राजू मडावी, पुंडलिक नागपूरकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांच्या मागणीची वेळोवेळी दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)