पोलिसांवर कारवाई करा
By Admin | Updated: June 20, 2016 01:15 IST2016-06-20T01:15:11+5:302016-06-20T01:15:11+5:30
चंदनवेली गावातील सहा महिला बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने गावातीलच दोन महिला दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून त्यांच्याकडून पकडलेली

पोलिसांवर कारवाई करा
एटापल्ली : चंदनवेली गावातील सहा महिला बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने गावातीलच दोन महिला दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून त्यांच्याकडून पकडलेली दारू १७ जून रोजी दुपारी १२.३० वाजता पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या तयारीत असताना बोलेपल्ली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गावंडे हे ८ ते १० कर्मचाऱ्यांसह चंदनवेली गावात आले व त्यांनी बचत गटाच्या महिलांना अर्वाच्य व जातीवाचक शिवीगाळ केली व अवैध दारूविक्रेत्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यासह दारूविक्रेत्या महिलांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बचत गटाच्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
चंदनवेली येथील सहा बचत गटाच्या महिलांनी वर्षा मेश्राम हिच्या घरून दोन निपा विदेशी दारू व नंदा भांडेकर हिच्या घरून दोन निपा विदेश दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याची तयारी चालविली होती. परंतु यादरम्यान सहायक पोलीस उपनिरीक्षक गावंडे ८ ते १० कर्मचाऱ्यांसह गावात आले व त्यांनी महिलांचे काहीही ऐकून घेतले नाही व महिलांना शिवीगाळ केली. दुसऱ्याच्या घरी शिरून तुम्हाला दारू पकडण्याचा अधिकार कुणी दिला, असे बोलून अंगावर धावून आले व बचत गटाच्या महिलांनाच जैलमध्ये टाकण्याची धमकी दिली, असा आरोप महिलांनी केला. निवेदन देताना जानोबाई तेलामी, रूक्मीबाई तेलामी व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)